भूखंड ताब्यात घेण्याचा सिडकोचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द

ज्या असंपादित जमिनीवर सिडकोने विकासकामे केली होती, ती जमीन सिडकोकडे कागदोपत्री हस्तांतरित होण्यापूर्वी भूधारक शिरीष घरत यांनी दोन त्रयस्त खासगी विकासकाला विकल्याची बाब उघडकीस आली.
भूखंड ताब्यात घेण्याचा सिडकोचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द

नवी मुंबई : खारघर येथे मोक्याच्या ठिकाणी भूधारक शिरीष घरत यांना दिलेल्या सुमारे ६० कोटी किमतीच्या २५०० चौरस मीटर भूखंडाचा करारनामा रद्द करून सदर भूखंड पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेण्याचा सिडकोचा निर्णय अखेर उच्च न्यायालयाने रद्द केला. आपल्याला दिलेला भूखंड रद्द करण्याच्या सिडकोच्या निर्णयाविरोधात भूधारक शिरीष घरत यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक ६९९ /२०२४ दाखल केली होती.

दरम्यान, ज्या असंपादित जमिनीवर सिडकोने विकासकामे केली होती, ती जमीन सिडकोकडे कागदोपत्री हस्तांतरित होण्यापूर्वी भूधारक शिरीष घरत यांनी दोन त्रयस्त खासगी विकासकाला विकल्याची बाब उघडकीस आली. सदर भूसंपादनात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिडकोने भूधारकास खारघर सेक्टर-७ येथे एकास एकच्या धरतीवर म्हणजेच संपादित जमिनीच्या क्षेत्रफळा इतक्याच दिलेल्या विकसित भूखंडाचा भाडेपट्टा करारनामा रद्द करून सदर भूखंड स्वतच्या ताब्यात घेतला होता.

बेलपाडा गाव, खारघर येथील सर्व्हे क्र. ४७४, गट क्र. १७ मधील २७ गुंठे असंपादित जमिनीपैकी २५ गुंठे जमीन ही शिरीष घरत, तर २ गुंठे जमीन ही लक्ष्मण घरत यांच्या मालकीची होती. त्यापैकी शिरीष घरत यांच्या २५०० चौ.मीटर असंपादित जमीनीतून सिडकोचा मेट्रो रेल प्रकल्प गेला आहे. तर काही जमीन रेन ट्री प्रकल्पासाठी सिडकोने वापरली होती. त्यामुळे आपल्याला खारघर परिसरात अन्य ठिकाणी २५ गुंठे जमीन सिडकोने द्यावी, अशी मागणी शिरीष घरत यांनी सिडकोकडे केली होती.

परंतु, शिरीष घरत यांचे सख्खे भाऊ अनंत यांचा मुलगा अभिजित अनंत घरत हे जीवंत असताना देखील ते मयत असल्याचे दाखवून शिरीष घरत यांनी सिडकोची जाणूनबुजून फसवणूक केल्याची तक्रार अभिजित घरत यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांसह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य दक्षता अधिकारी यांच्याकडे केली होती.

एकास एकच्या धर्तीवर इतरांनाही सिडको भूखंड देणार का?

एखाद्या भूधारकाला त्याच्या पसंतीप्रमाणे संपादन केलेल्या जमिनी इतक्याच (एकास एकच्या धर्तीवर) क्षेत्रफळा इतकी जमीन (भूखंड) देण्याचा हा प्रकार सिडकोद्वारा पहिल्यांदाच घडत आहे. त्यामुळे इतर भूधारकांनादेखील त्यांच्या पसंतीप्रमाणे सिडको भूखंड देणार आहे का? सिडकोने तसे न केल्यास राजकीय लागेबंधे असलेल्या शिरीष घरत यांना एक न्याय आणि इतर भूधारकांना दुसरा न्याय देण्याच्या सिडको व शासनाच्या कृतीचा प्रकल्पग्रस्तांकडून मोठ्याप्रमाणात विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असंपादित जमिनीवर केलेली विकासकामे अंगलट

खारघर येथील असंपादित जमिनीवर मेट्रो प्रकल्प व रस्त्याचे केलेले विकासकाम सिडकोच्या चांगलेच अंगलट आले आहे. संबंधित जमीन मालकाने आपली जमीन संपादित न करता सिडकोने ती विकास कामात उपयोगात आणल्याने तितकीच विकसित जमीन आपल्याला अन्यत्र द्यावी अशी मागणी सिडकोकडे केली. त्यानंतर सिडकोने मागचा पुढचा विचार न करता संबंधित भूधारकास तितकीच जमीन देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळात मंजूर करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला.

logo
marathi.freepressjournal.in