जिल्हा परिषदेच्या सीबीएसई शाळेची पहिली घंटा वाजली; कर्जतमध्ये पहिली इयत्ताचे वर्ग सुरू

देशभरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीबीएसई दर्जाचे शिक्षण सुरू करण्याला सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या सीबीएसई शाळेची पहिली घंटा वाजली; कर्जतमध्ये पहिली इयत्ताचे वर्ग सुरू
Published on

विजय मांडे/कर्जत

देशभरातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीबीएसई दर्जाचे शिक्षण सुरू करण्याला सुरुवात झाली आहे. ऐन एप्रिलमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यातील कळंब शाळेत सीबीएसईच्या इयत्ता पहिलीची घंटा वाजल्याने सीबीएसईची मुहूर्तमेढ रोवण्यात कर्जतने बाजी मारल्याचे चित्र पहावयास दिसून येत आहे.

पहिली इयत्तेत ३५ मुलांनी प्रवेश घेतला असून त्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा पालक आणि शिक्षक तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत साजरा झाला. केंद्र सरकारच्या धोरणानुसार रायगड जिल्ह्यात सर्वात आधी कर्जत येथील कळंब सारख्या ग्रामीण भागात सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू होत आहे. या शाळेला केंद्र सरकारने पीएमश्री आदर्श केंद्र शाळा असा दर्जा दिला आहे. या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग मागील वर्षापासून सुरू आहेत. आज रायगड जिल्ह्यातील पहिली सीबीएसई माध्यमाची शाळा सुरू होत असताना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, विस्तार अधिकारी राजपूत यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र बदे, उपाध्यक्ष सुनील बदे तसेच पालक महेश कोंडीलकर,खरेदी विक्री संघ संचालक अरुण बदे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष गणेश मानकामे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक के. डी. राऊत आदी प्रमुख उपस्थित होते.

गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या हस्ते या वर्गाचे उद्घाटन फित कापून झाले. यावेळी सुशांत पाटील यांनी शाळा आणि परिसर पाहून अत्यंत समाधान व्यक्त केले. तसेच एखादी कॉन्व्हेन्ट स्कूल सारखी जिल्हा परिषदेची शाळा दिसत असल्याने आनंद होत असल्याचे गौवोद्गार काढले. रामदास टोणे अधिव्याख्याता पनवेल डाएट यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना नवीन शिक्षण पद्धतीचे महत्त्व समजावून सांगितले.

याप्रसंगी शाळेचे शिक्षक आणि तालुका क्रीडा समन्वयक किशोर पाटील,यांनी सूत्रसंचालन केले. या पहिल्या शाळेच्या सीबीएसई माध्यमाचे शिक्षक एच. के. लोहकरे, सहदेव चव्हाण, जितेंद्र रोठे, रुपेश मोरे, कल्पना गवारगुर, बाळकृष्ण पवार, सुनीता येंदे, हुमेरा दुर्राणी तसेच कोटक एज्युकेशनचे शामली तेरसे यांचे कर्जत पंचायत समितीकडून कौतुक करण्यात आले. पालक वर्गाकडून शुभेछा देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून शाळेत प्रवेश

या माध्यमाच्या शैक्षणिक वर्ष २०२५ /२६ साठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांना ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कळंब ते रायगड जिल्हा परिषद शाळा मराठीपर्यंत ढोलताशांच्या गजरात तसेच लेझीमच्या ठेक्यावर आणि गुलाब पुष्पांचा वर्षावात मोठ्या आनंदात आणि उत्साहात स्वागत यात्रा काढून शाळेच्या आवारात आणण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in