उद्घाटनाला पाहुणे मिळेनात; सिडकोचे भूमिपुत्र भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी वैविध्यपूर्ण कल्याणकारी उपक्रम सिडकोद्वारा हाती घेण्यात येतात.
उद्घाटनाला पाहुणे मिळेनात; सिडकोचे भूमिपुत्र भवन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
Published on

नवी मुंबई : भूमिपुत्रांच्या हक्कासाठी व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नवी मुंबईतील उलवे येथे सिडकोद्वारा उभारण्यात आलेले भूमिपुत्र भवन गत दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तब्बल ८५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या भूमिपुत्र भवनाला फेब्रुवारी २०२२ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राफ्त झाली आहे. तेव्हापासून देशाच्या व राज्याच्या मान्यवर व्यक्तींची या भवनाच्या उद्घाटनासाठी प्रतीक्षा केली जात आहे. परंतु, आजतागायत भूमिपुत्र भवनाच्या उद्घाटनासाठी सिडको आजही मान्यवरांच्या प्रतीक्षेत आहे.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी वैविध्यपूर्ण कल्याणकारी उपक्रम सिडकोद्वारा हाती घेण्यात येतात. नवी मुंबईतील मूळ रहिवाशांच्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सिडकोने २०१० साली सिडको क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यांतर्गत नेरूळ येथे आगरी-कोळी भवनची निर्मिती करण्यात आली. या भवनातील सभागृह व अन्य सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने सिडको प्रकल्पग्रस्तांचे कौटुंबिक सोहळे, लग्नकार्य व अन्य उपक्रम आगरी-कोळी भवनात मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

उरण, पनवेल तालुक्यातील सिडको प्रकल्पग्रस्तांना नेरूळ येथील आगरी-कोळी भवनचे ठिकाण दूर पडत असल्याने आगरी-कोळी भवनच्या धर्तीवर सिडको क्षेत्रात मोडणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सिडको प्रकल्पग्रस्तांसाठी देखील याचप्रकारची सुविधा निर्माण करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून सातत्याने केली जात होती. त्यामुळे उलवे येथे भूमिपुत्र भवनाच्या माध्यमातून सिडकोद्वारा पनवेल, उरणमधील प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी सांस्कृतिक केंद्राची निर्मिती केली.

विशेष म्हणजे नेरूळ-उरण मार्गावरील बामणडोंगरी रेल्वे स्थानकापासून नजीकच्या अंतरावर मोक्याच्या ठिकाणी भूमिपुत्र भवन उभारण्यात आले आहे. वाणिज्यिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असलेला उलवे नोड तसेच सिडकोच्या उन्नती गृहनिर्माण संकुलापासून हे केंद्र हाकेच्या अंतरावर आहे.

पाहुणे उपलब्ध झाल्यावरच उद्घाटन

आगरी-कोळी समाजाला सांस्कृतिक उपक्रम व प्रदर्शन सादरीकरणासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा सिडकोचा या भवनाच्या उभारणी मागचा उद्देश आहे. त्यामुळे भूमिपुत्र भवन प्रकल्पग्रस्त व इतर नागरिकांसाठी त्वरित उपलब्ध करून द्यावे. ज्यावेळेस सिडकोला उद्घाटनासाठी पाहुणे उपलब्ध होतील, त्यावेळेस या भवनचे लोकार्पण सिडकोने करावे, अशी प्रतिक्रिया सिडको प्रकल्पग्रस्तांनी दिली.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

५६०० चौ.मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर भूमिपुत्र भवनचा विस्तार

बेसमेंट अधिक तळ मजला अधिक तीन मजली आरसीसी इमारत

११५ चारचाकी व १०० दुचाकी क्षमतेचे दुस्तरीय बेसमेंट पार्किंग

तळमजल्यावर १००० आसन क्षमतेच्या बहुद्देशीय सभागृहासह स्टील्ट व किचन

पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर १००० हजार आसन क्षमतेच्या सज्जासह प्रेक्षागार

तिसऱ्या मजल्यावर १००० आसन क्षमतेचे बहुद्देशीय सभागृह तथा प्रशिक्षण केंद्र

logo
marathi.freepressjournal.in