एपीएमसी मार्केटमधील लिलावगृहातील छताची लोखंडी कमान कोसळली

कांदा-बटाटा बाजारातील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षांनुवर्षे रेंगाळला आहे.
 एपीएमसी मार्केटमधील लिलावगृहातील छताची लोखंडी कमान कोसळली

नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये एकूण ५ बाजारपेठा आहेत. यापैकी मुख्य आणि तितकीच दुर्लक्षित झालेली बाजारपेठ म्हणजे कांदा बटाटा मार्केट. मंगळवार १२ जुलै रोजी बाजार समितीतील धोकादायक कांदा-बटाटा बाजार आवारातील लिलावगृहातील छताची लोखंडी कमान कोसळली. ती वाहनांवर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

कांदा-बटाटा बाजारातील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षांनुवर्षे रेंगाळला आहे. सर्व इमारती जीर्ण झाल्या आहेत. प्रतिदिन करोडो रुपयांची उलाढाल आणि लाखो नागरिकांचा वावर असणाऱ्या या बाजारपेठेत जीव मुठीत घेऊन व्यापारी तसेच मजूर काम करत आहेत. बहुतांश ठिकाणी नादुरुस्त असलेल्या गाळ्यांचे स्लॅप पडण्याच्या अवस्थेत आहेत. तर कुठे पावसाच्या पाण्याची छतामधून गळती. बाजार आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी लिलावगृहाची उभारणी केली आहे. या ठिकाणी दररोज मोठी उलाढाल होत आहे. मंगळवारी सकाळी वाहने खाली होत असताना अचानक पत्र्याची एक लोखंडी कमान कोसळली. या पत्र्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी जी नाली बनवली होती त्याची ही कमान होती. कमान ज्यावेळी कोसळली त्यावेळी या ठिकाणी वाहनांतून कामगार शेतमाल खाली करत होते. मात्र सदर कमान वाहनांवर पडल्याने पुढील अनर्थ टळला. यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी १३ जुलै रोजी एका गाळ्यातील स्लॅप पडण्याची तसेच बहुतांश ठिकाणी छतातून पाणी दरवर्षी गळत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in