परदेशातील कंपनीत नोकरी देण्याचे आमिष; वाशीमधील व्यक्तीला ११ लाखांचा गंडा

मित अवस्थी (५२) हे वाशी सेक्टर-१७ मध्ये राहण्यास असून त्यांना इंटरनॅशनल नोकरीची गरज असल्याने त्यांनी विविध ठिकाणी अर्ज केले होते.
परदेशातील कंपनीत नोकरी देण्याचे आमिष; वाशीमधील व्यक्तीला ११ लाखांचा गंडा

नवी मुंबई : परदेशातील कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने वाशी सेक्टर-१७ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला वेगवेगळ्या कारणासाठी पैसे भरण्यास सांगून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख १० हजार रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर टोळीचा शोध सुरू केला आहे.

मित अवस्थी (५२) हे वाशी सेक्टर-१७ मध्ये राहण्यास असून त्यांना इंटरनॅशनल नोकरीची गरज असल्याने त्यांनी विविध ठिकाणी अर्ज केले होते. त्यानंतर गत जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या मोबाईलवर मायकल जोसेफ नावाच्या सायबर चोरट्याने संपर्क साधून त्यांची सिंगापूर व इतर ठिकाणी जॉब मिळवून देण्याचा बहाणा करून त्यांना ६१५० रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार अवस्थी यांनी ग्रॉस कॅरिअर.कॉम या वेबसाइटवर सदर रक्कम पाठवून दिल्यानंतर दुसऱ्या सायबर चोरट्याने अवस्थी यांना संपर्क साधून परदेशातील नोकरीचे त्यांचे पक्के झाल्याचे सांगितले. पुढील एक राऊंड बाकी असल्याचे व त्यासाठी त्याला रक्कम भरावी लागेल असे सांगून सदर रक्कम रिफंडेबल असल्याचे सांगितले.

सदर रक्कम परत मिळणार असल्याचे सायबर चोरट्याकडून सांगण्यात आल्याने अवस्थी यांनी सायबर चोरटे सांगतील त्यानुसार ११ ते १६ जानेवारी या कालावधीत तब्बल ११ लाख १० हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर अवस्थी यांना आणखी १ लाख ३० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र अवस्थी यांनी सदर रक्कम भरू शकत नसल्याचे सांगून आपली रक्कम परत करण्यास सांगितले असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in