नवी मुंबई : अनेक वर्षांच्या परिश्रमाला यश आले असून नवी मुंबईत पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय आता उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science)’ सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे महानगरपालिकेस शक्य होणार असून महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. तर मी अतिशय आनंदी असून खूप मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशी प्रतिक्रिया या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनेक वर्षांचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वत:चे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत राज्य शासन व केंद्र शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. राज्य शासनामार्फत आवश्यक परवानगी प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व त्यांनी संबंधित विभागांना जलद कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले असल्याचे म्हटले जात आहे.
त्यानुसार राज्य शासनामार्फत आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोकसभा सदस्य खा. नरेश म्हस्के यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव व केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबतचा पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा केला.
अतिशय चांगली बाब असून आता लवकरात लवकर पुढील टप्पे पार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ नवी मुंबईच नव्हे तर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि नवी मुंबई तसेच परिसरातील रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.
- डॉ कैलास शिंदे (आयुक्त प्रशासन न.मु.मनपा)
माझ्या ड्रिम प्रोजेक्टला हिरवा कंदील मिळाला आहे. माझे सर्व वरिष्ठ तसेच यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व घटकांचे मी आभार मानते. हा प्रकल्प म्हणजे नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. या प्रकल्पामुळे सामान्य लोकांना रुग्ण सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात होणार आहे. हेच या प्रकल्पाचे मोठे यश आहे. - मंदा म्हात्रे (आमदार बेलापूर)
महाविद्यालयात ४ शाखांचा समावेश
सदर मंजुरीनुसार पीजी मेडीकल सायन्स इन्स्टिटयुटमध्ये पहिल्या टप्प्यात 'मेडिसिन (३ सीट्स)’, ‘ऑर्थोपॅडीक (२ सीट्स)', ‘गायनॅकोलॉजी (८ सीट्स)' व ‘पिडीयाट्रीक (४ सीट्स)’ अशा ४ शाखा सुरू करण्यात येत असून लवकरच 'सर्जरी' याही शाखेला परवानगी प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मेडिकल सायन्स इन्स्टिट्युट सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरूळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे.