उरण स्थानकात रेल्वे प्रवाशांत वाढ; रात्री १२ वाजेपर्यंत लोकल सुरू ठेवण्याची मागणी

लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात आली, तर प्रवाशांच्या संख्येतही आपसूकच वाढ होणार आहे. असे असतानाही मात्र या प्रवासी रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे.
उरण स्थानकात रेल्वे प्रवाशांत वाढ; रात्री १२ वाजेपर्यंत लोकल सुरू ठेवण्याची मागणी
Published on

उरण : उरण-नेरूळ मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे; मात्र रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात यावी आणि रात्रीच्या वेळी १२ वाजेपर्यंत शेवटची ट्रेन सोडण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

उरण-नेरूळ-बेलापूर या रेल्वे मार्गावरून १२ जानेवारी रोजी प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. १२ जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या या ४७ दिवसांत उरण स्थानकातून ५० हजार तिकिटांची विक्री झाली आहे. उरण स्थानकातून या दोन महिन्यांत एक लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. या ४७ दिवसांत तिकीटविक्रीतून मध्य रेल्वे प्रशासनाने १६ लाखांचा गल्ला जमा केला आहे. या व्यतिरिक्त एटीव्हीएम मशीन आणि मोबाईलवरूनही हजारो प्रवाशांनी तिकिटे खरेदी केली आहेत.

लोकलच्या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ करण्यात आली, तर प्रवाशांच्या संख्येतही आपसूकच वाढ होणार आहे. असे असतानाही मात्र या प्रवासी रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे.

उरण-बेलापूर-नेरूळ रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे आणि या स्थानकांवरून रात्री १२ वाजेपर्यंत शेवटची लोकल सुरू करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. अद्याप तरी असा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासन विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in