तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल क‌रून त्याला अटक केली आहे.
तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

नवी मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय नराधमाने आपल्या शेजारी राहणाऱ्या ३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल क‌रून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील अटक आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहण्यास आहे. आरोपी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून उरण भागात आपल्या बहिणींसह राहत आहे. या आरोपीची बहीण शेजारी राहणाऱ्या ३ वर्षांच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी घेऊन येत होती. शुक्रवारी दुपारी देखील आरोपीच्या बहिणीने शेजारी राहणाऱ्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी आणले होते. यादरम्यान आरोपीने पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्याने आपल्याकडे घेतले होते. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

या प्रकारानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी गेल्यानंतर एका कोपऱ्यात गुपचूप बसल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घाबरून काहीच सांगितले नाही. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने रात्री नेरूळमधील मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले. शेजारी राहणाऱ्या नराधमानेच हे कृत्य केल्याचे उघड झाल्यानंतर या आरोपीला बलात्कार व पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. न्यायालयाने या आरोपीची १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याचेही निकम यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in