नवी मुंबई : रेल्वेमध्ये अनाऊन्समेंट पदावर नोकरीला लावण्याच्या बहाण्याने जळगाव येथील तरुणाला रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याच्याकडून २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. एम. के. शहा व संदीप पाठक असे या तरुणाची फसवणूक करणाऱ्यांची नावे असून सीबीडी पोलिसांनी या दोघांविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आशिष पाटील (३२) असे असून तो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात राहणारा आहे. बेलापूर येथील डॉ. एम. के. शहा यांचा मित्र संदीप पाठक हा रेल्वेमध्ये नोकरीला असल्याचे व तो रेल्वेमध्ये अनाऊन्सर म्हणून नोकरीला लावून देत असल्याची माहिती आशिषला त्याच्या मित्राकडून काही महिन्यांपूर्वी मिळाली होती. त्यामुळे आशिषने बेलापूर येथील डॉ. एम. के. शहा यांना संपर्क साधून चौकशी केली असता, डॉ. शहा यांनी त्याला रेल्वे विभागातील अनाऊन्समेंटच्या जॉबसाठी २५ हजार रुपये आधी द्यावे लागतील. तसेच काम झाल्यानंतर बाकी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले होते.
आशिषला नोकरीची गरज असल्याने त्याने सदर जॉबसाठी होकार दिल्यानंतर डॉ.शहा यांनी आशिषकडून त्याचे शैक्षणिक कागदपत्रे मोबाईल फोनवर मागून घेतली होती. गत २७ नोव्हेंबर रोजी आशिषचे नियुक्ती पत्र तयार झाल्याचे सांगून त्याला बेलापूर रेल्वे स्टेशनजवळ बोलावून घेण्यात आले होते. त्यानुसार एका तरुणाने आशिषला नियुक्तीपत्र न देता ते त्याला दाखवून त्याचा मोबाईलवर फोटो काढून घेण्यास सांगितले. त्यानंतर आशिषला रेल्वे स्थानकावर अनाऊन्समेंटच्या ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्याच्याकडे असलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्याला समजले. त्यानंतर आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आशिषने सीबीडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.