खोपटे नवनगर प्रकल्पाला विरोध; २७ मार्चला शेतकरी सामूहिक हरकती नोंदविणार

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ४ मार्च रोजी याची अधिसूचना काढून एक महिन्याच्या आत याबाबत हरकती नोंदविण्याचे कळविण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या सोन्याच्या मोलाच्या जमिनी शासन कवडीमोल दराने हिसकावू पहात असल्याची भावना येथिल शेतकऱ्यांची आहे
खोपटे नवनगर प्रकल्पाला विरोध; २७ मार्चला शेतकरी सामूहिक हरकती नोंदविणार

उरण : महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने एक अधिसूचना काढून उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांसाठी नवनगर हा प्रकल्प जाहीर केला आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएला विकास प्राधिकरण म्हणून नेमले आहे; मात्र या प्रकल्पाला येथील स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असून, येत्या २७ मार्चला शेतकरी एमएमआरडीएच्या बेलापूर येथील कार्यालयात सामूहिक हरकती नोंदविणार आहेत.

अटलसेतू (एमटीएचएल) आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणेकरिता सेतू लगतच्या जमिनी शासन अल्पदरात घेऊन त्याचा विकास करणार असल्याची ही योजना आहे. वास्तविक पाहता हा प्रकल्प जाहीर करण्याअगोदर येथील शेतकऱ्यांशी, नागरिकांशी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या बद्दल माहिती देणे गरजेचे होते; मात्र महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ४ मार्च रोजी याची अधिसूचना काढून एक महिन्याच्या आत याबाबत हरकती नोंदविण्याचे कळविण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या सोन्याच्या मोलाच्या जमिनी शासन कवडीमोल दराने हिसकावू पहात असल्याची भावना येथिल शेतकऱ्यांची आहे.

शासनाने या जमिनी घेतल्यास सिडको प्रकल्पग्रस्तांसारखी शेतकऱ्यांनी गरजेपोटी केलेली बांधकामे ही अनधिकृत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचा या प्रकल्पास विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पाला विरोध म्हणून एमएमआरडीएविरोधी शेतकरी संघर्ष समितीतर्फे २७ मार्चला सामूहिक हरकती नोंदविण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in