तीन RTO अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश

पोलिसांच्या तपासात अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक मोटार वाहन निरीक्षक व एक सहायक वाहन निरीक्षक यांनी आरोपींशी संगनमत करून...
तीन RTO अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश

नवी मुंबई : विविध राज्यातून चोरण्यात आलेल्या ट्रक, हायवा, ट्रेलर यासारख्या वाहनांचे चेसी व इंजिन क्रमांकात फेरबदल करून त्यांची परराज्यात नोंदणी करून सदर वाहनांची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पुनर्नोंदणी करून या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण ५ कोटी ५० लाख रुपये किमतीची २९ वाहने जप्त करून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ९ आरोपींना अटक केली आहे. यात ३ आरटीओ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

या रॅकटमध्ये सहभागी असलेले आरोपी हे विविध राज्यातून ट्रक, हायवा, ट्रेलर यासारख्या वाहनांची चोरी करून त्याच्या चेसी व इंजिन क्रमांकात फेरबदल करून या वाहनांची अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यात नोंदणी करत होते. त्यानंतर सदर टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच वाहनांचे एनओसी प्राप्त करून त्याची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पुनर्नोंदणी करून सदर वाहनांची लाखो रुपयांमध्ये विक्री करत होते. गत मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारे बनावटगिरी करून विकलेले दोन ट्रक एपीएमसी मार्केटमध्ये आले असताना, नवी मुंबई पोलिसांच्या वाहन चोरी शोध पथकाने हे दोन ट्रक ताब्यात घेतले होते.

या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर, पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, प्रताप देसाई यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने केलेल्या तपासात जावेद अब्दुला शेख उर्फ मनियार हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जावेद याला सहकार्य करणाऱ्या ५ आरोपींना नागपूर, अमरावती, धुळे, बुलढाणा, सुरत, औरंगाबाद या भागात शोध घेऊन त्यांना देखील या गुन्ह्यात अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक मोटार वाहन निरीक्षक व एक सहायक वाहन निरीक्षक यांनी आरोपींशी संगनमत करून वाहने समक्ष हजर नसताना त्यांची पुर्ननोंदणीची कार्यवाही केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी नागपूर येथील आरटीओ एजंटला देखील अटक केली आहे.

अमरावती, नागपूर आरटीओत पुनर्नोंदणी

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जावेद अब्दुल्लाने देशभरातील विविध राज्यातून चोरी करून आणलेले ट्रक, हायवा, ट्रेलर या वाहनांच्या चेसी व इंजिन क्रमांकात फेरबदल करून, वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीप्रमाणे ॲल्युमिनियमच्या इंजिन नंबरप्लेट बनवून घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच जावेद अब्दुल्ला शेखने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने गाडीवरील मूळ चेसी नंबर खोडून त्यावर नवीन दुसरा चेसी नंबर टाकून सदरच्या गाड्या या नागपूर, अमरावती व इतर आरटीओ कार्यालयात पुनर्नोंदणी करून घेतल्याचे आढळून आले आहे.

वेगवेगळ्या पत्त्यांचे आधारकार्ड देखील तयार

मुख्य आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयारने स्वत:चे २ पॅनकार्ड बनविले असून त्याने त्याच्या साथीदाराचे वेगवेगळ्या पत्त्यांचे आधारकार्ड तयार करून काही वाहनांची आरटीओमध्ये पुनर्नोंदणी केल्याचे आढळून आले आहे. तसेच एकच मोबाईल नंबरचा वापर करून इतर वाहनमालकांच्या नावाची आरटीओमध्ये नोंदणी करून घेतल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.

फसवणुकीचे एकूण १० गुन्हे दाखल

या प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद मणियार याच्याविरोधात नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, औरंगाबाद आयुक्तालय व धुळे येथे चोरी व फसवणुकीचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. जावेद अब्दुल्ला शेख याचा उत्तर प्रदेश व हरयाणा राज्यात चार गुन्ह्यांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी रफीक मन्सुरी याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

जावेद अब्दुल्ला शेख उर्फ मनियार (४९), मोहम्मद अस्लम बाबा शेख (४९), शिवाजी आसाराम गिरी (४८), अमित सिंग उर्फ मोनू राजपूत (३३), रफीक शेख दिलावर मन्सुरी उर्फ रफीक मामू (४२), वरुण रमेश जिभेकर उर्फ सील (४१), सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील (४३), निरीक्षक गणेश वरुटे (३५), एआरटीओ सिद्धार्थ विजय सिंग ठोके (३५).

logo
marathi.freepressjournal.in