
नवी मुंबई : टोरेस कंपनीने नवी मुंबईतील १९३ लोकांची तब्बल ४.५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी अत्तापर्यंत केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणात आणखी तक्रारदारांची संख्या वाढण्याची व फसवणूक केलेल्या रकमेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटकडून टोरेस कंपनीच्या सानपाडा येथील कार्यालयातून कंपनीचे हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
नवी मुंबई पोलिसांच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला टोरेस कंपनीमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहाराची दोन महिन्यांपूर्वी कुणकुण लागली होती. त्यामुळे एफआययूने त्यावर तेव्हापासूनच काम सुरू केले होते. त्यासाठी टोरेस कंपनीमध्ये एफआययूमधील पोलिसाला बनावट ग्राहक बनवून पाठवून त्यांच्याकडे मोझीनाइट स्टोनची खरेदी देखील केली होती. त्यावर टोरेस कंपनीने पोलिसाला साप्ताहिक ९ टक्केप्रमाणे बोनस देखील दिले होते. त्यानंतर एफआययूने केलेल्या पडताळणीत टोरेस कंपनीला डिपॉझिट घेण्याचे अधिकार नसताना सदर कंपनीने डिपॉझिट घेतल्याचे व गुंतवणूकदारांना १२ टक्केपर्यंत व्याज देऊन त्यांना अधिकची गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलीस उपायुक्त काळे यांनी सांगितले.
त्याशिवाय या कंपनीने साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूकदार आणल्यास त्यावर अवाजवी जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तसेच सिंथेटिक मोझीनाइट या स्टोनची भविष्यात हिऱ्यापेक्षा जास्त किंमत मिळेल असा गुंतवणूकदारांमध्ये भ्रम निर्माण केल्याचे एफआययूने केलेल्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे फायनान्शियल युनिटने या कंपनीवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असतानाच या कंपनीच्या चालकांनी आपले कार्यालय बंद करून पलायन केले. त्यानंतर फायनान्शियल युनिटने तत्काळ या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे अमित काळे यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या तपासात टोरेस कंपनीकडून १९३ गुंतवणूकदारांची ४.५० कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यात आणखी तक्रारदार वाढण्याची व फसवणुकीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता काळे यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या कंपनीच्या कार्यालयातील कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाईल व इतर कागदपत्रे जफ्त करण्यात आले असून त्याद्वारे या प्रकरणाचा फायनान्शियल युनिटकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा ताबा घेण्याची देखील कार्यवाही सुरू असल्याचे व या प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे काळे यांनी सांगितले.
फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटकडून यापूर्वीच कारवाईला सुरुवात
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी वर्षभरापूर्वीच आर्थिक गुप्तवार्ता पथकाची (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) स्थापना करण्यात आली आहे. या युनिटकडून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कंपनी व आस्थापनांची गोपनीय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे काम केले जात आहे. सदर युनिटद्वारे प्रत्येक मॉलमधील शॉप, कार्यालयात जाऊन त्याठिकाणी सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली जाते. संबंधितांनी ज्या कारणासाठी लायसन्स घेतले आहे, त्याठिकाणी तोच व्यवसाय सुरू आहे, याची खारजमा या युनिटकडून केली जाते. एखाद्या कंपनीच्या व्यवहारात काही गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर या युनिटद्वारे कायदेशीर कारवाई केली जाते.
सिंथेटिक मोझीनाइट स्टोनची विक्री करून उकळत होते रक्कम
एफआययूने या प्रकरणात बनावट ग्राहक बनून टोरेस कंपनीकडून खरेदी केलेल्या मोझीनाइट स्टोनची तपासणी करून घेतली असता, ते सिंथेटिक मोझीनाअट स्टोन असल्याचे आढळून आले होते. तसेच त्या स्टोनची बाजारात किंमत फक्त २३० रुपये इतके असल्याचे आढळून आले होते. मात्र या कंपनीकडून सदरचा स्टोन हा हिऱ्यापेक्षा स्वस्त असल्याचे व तो भविष्यात हिऱ्याप्रमाणे अधिक किमतीचा व लोकप्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच लोकांना सदरचा स्टोन ६ ते ७ हजारांमध्ये विक्री करून त्याबदल्यात अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली.