नवी मुंबई : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी वाहतूक पोलिसही सज्ज, 'अशी' आहे वाहतूक व्यवस्था

पनवेल, ठाणेकडून सभास्थळी येणारी वाहने कळंबोलीकडून उरणमार्गे वळवण्यात आली आहेत.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नवी मुंबई : सरकारचे महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असून याची जय्यत तयारी जावळपास पूर्ण झाली आहे. यात सर्वात महत्त्वाचा घटक असलेली वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरुवारी वाहतूक सराव करण्यात आला. त्यामुळे काही वेळ उरण ते किल्ले गावठाण दरम्यान अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती; मात्र नियोजित वेळेत वाहतूककोंडी सोडवण्यात यश आले.

नाशिकमध्ये रोड शो, काळाराम मंदिरात दर्शन आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाला उपस्थित राहिल्यावर मोदी नवी मुंबईत दाखल होतील. न्हावाशेवा ते शिवडी हा जगातील सर्वात मोठ्या सागरी सेतूपैकी एक असलेल्या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदी हे सभा घेणार आहेत. त्यामुळे कुठेही वाहतूककोंडी होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे. यासाठी ३०० पेक्षा अधिक वाहतूक पोलीस सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली, तर वाहतूक उपायुक्त यांच्या मार्गदर्शखाली वाहतूक नियंत्रण केले जाणार आहे.

१२ तारखेची वाहतूक व्यवस्था

पनवेल, ठाणेकडून सभास्थळी येणारी वाहने कळंबोलीकडून उरणमार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरून ठाणे, नवी मुंबईकडून येणारी वाहने नियमित मार्गावरून किल्ले गावठाणमार्गे सभास्थळी मार्गस्थ होतील. यावेळी इतर गाड्याही मार्गक्रमण करू शकणार आहेत. न्हावाशेवा येथे सागरी सेतूचे लोकार्पण झाल्यावर पंतप्रधान सभास्थळी मोटारीने येणार असून, या दरम्यान अन्य वाहनांसाठी सदर मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे; मात्र याबाबत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

पंतप्रधानांचे अन्य कार्यक्रम

याशिवाय, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याचे भूमिपूजन, नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण, वसई-विरार आणि मीरा-भाईंदरच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण, सीवूड-बेलापूर-उरण रेल्वे गाडीचा प्रारंभ, सातांक्रूझ ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण, नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकाचे उद्दाटन मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील कार्यक्रमात कळ दाबून करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in