नवी मुंबई : गावातील विकासकामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी उरण पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता रेश्मा ओंकार नाईक (३१) व रागयड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता सतीश वसंत कांबळे (५१) या दोघांना अटक केली आहे.
उरण तालुक्यातील गावातील विकासकामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्याकरिता उरण पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता रेश्मा ओंकार नाईक यांनी स्वत: साठी व रागयड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता सतीश कांबळे यांच्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गत ८ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर रेश्मा यांनी तडजोडीअंती २५ हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ फेब्रुवारी रोजी सापळा लावला होता.
मात्र, रेश्मा नाईक यांनी लाचेची रक्कम रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता सतीश कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी सहाय्यक अभियंता सतीश यांनी तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्वीकारल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने रंगेहाथ पकडले. त्यानंतर या पथकाने उरण पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता रेश्मा नाईक यांनाही ताब्यात घेतले. सदरची कारवाई नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे व त्यांच्या पथकाने केली.