डोंगराला लागलेल्या आगीत शेकडो आंब्याची झाडे खाक; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील भूमाफियांचा धंदा तेजीत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात सुरू आहे
डोंगराला लागलेल्या आगीत शेकडो आंब्याची झाडे खाक; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी
Published on

उरण : उरण तालुक्यातील वनसंपदाच्या रक्षणाकडे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्ष यामुळे भूमाफियांनी डोंगर, माळरान परिसर पोखरण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. माती काढणे सोयीस्कर व्हावे, यासाठी वृक्षवल्लीने भरलेल्या जंगलाना आगी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी चिरनेरच्या डोंगरात आग लागल्यामुळे आंब्याच्या फळांनी बहरलेली शेकडो झाडे जळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील भूमाफियांचा धंदा तेजीत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात काही व्यावसायिकांनी डोंगर, माळरान परिसराला आगी लागण्यास सुरुवात केली आहे. डोंगरांना आगी लागण्याच्या घटनांमुळे डोंगर परिसरात वावरणाऱ्या प्राण्याच्या, पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी डोंगरात अज्ञात समाजकंटकांनी वणवा लावला होता. या वणव्यात चिरनेरमधील संदेश संतोष चिर्लेकर, तुळशीदास चिर्लेकर, काशिनाथ दामोदर खारपाटील, प्रशांत राजाराम म्हात्रे, राजू संभाजी चिर्लेकर, रमेश फोफेरकर आणि इतर शेतकऱ्यांची शेकडो आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे शेतकऱ्यांचे फळांनी बहरलेली शेकडो आंब्याची कलमे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे हातात आलेल्या आंब्याच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आमच्या पिकांचे पंचनामे करून आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी तालुका तहसीलदारांकडे वणव्यात जळालेल्या आंबा झाडांच्या नुकसानीबाबत अर्ज करावा आणि तहसीलदारांनी आदेश दिल्यास महसूल विभाग आणि आम्ही संयुक्तरीत्या पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

-अर्चना सुळ (तालुका कृषी अधिकारी, उरण)

logo
marathi.freepressjournal.in