नवी मुंबई : खारघर भागात एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांना खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सन्डे इजेको ओझोगु (४५) व पिटर मुनाचिमसो नोफो (३५) अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजार रुपये किमतीचे ११४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हे अमली पदार्थ तसेच त्यांची स्कुटी जप्त करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर-२० भागात जलवायु विहारच्या पाठीमागे दोन नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या पथकाने गत शुक्रवारी सायंकाळी खारघर सेक्टर-२० मध्ये सापळा रचला होता. यावेळी त्या भागात संशयास्पदरित्या स्कुटीवररून आलेल्या सन्डे इजेको ओझोगु व पिटर मुनाचिमसो नॉफो या दोन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, सन्डे इजेको ओझोगु याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५६ ग्रॅम वजनाचा ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा सफेद क्रिम रंगाचा खडासारखा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला. तर पीटर मुनाचिमसो नॉफो याच्याजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ५८ ग्रॅम वजनाचा पिवळसर रंगाचा गोळ्यासारखा असलेल्या ५ लाख ८० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडे सापडलेले तब्बल ११ लाख ४० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करून दोन नायजेरियन नागरिकांना एनडीपीएस कलमाखाली अटक केली आहे.
मॅफेड्रॉनच्या कारवाईनंतर सायन पनवेल मार्गालगत खारघर येथील टॅक्सी स्टँडजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद रफिक मोहम्मद सईद शेख (५२) याला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याच्या रिक्षाची तपासणी केली असता, रिक्षा ड्रायव्हर सिटखाली एका पिशवीमध्ये ३० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजासह त्याची रिक्षा जप्त करून मोहम्मद रफिक याला एनडीपीएस कलमाखाली अटक केली. सदरचा गांजा त्याने कुठून व कुणाला विक्री करण्यासाठी आणला होता. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.