पनवेलमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

गंभीर जखमी झाल्याने त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पनवेलमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

नवी मुंबई : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यातील एका अपघातात एसटी बसच्या धडकेत ६३ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या अपघातात भरधाव वेगातील मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही अपघातांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पनवेलच्या तक्का परिसरातील सिद्धी हाऊस इमारतीत राहणाऱ्या कल्पनाचंद लक्ष्मणचंद ठाकूर (६३) या गत मंगळवारी सकाळच्या सुमारास आपल्या ११ वर्षीय नातीला स्कूलबसमध्ये सोडण्यासाठी इमारतीच्या खाली गेल्या होत्या. नातीला स्कूलबसमध्ये सोडल्यानंतर कल्पनाचंद या रस्ता ओलांडून घरी परतत असताना कर्जत येथून पनवेल एसटी डेपोच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसने कल्पनाचंद ठाकूर यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेलमधील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पनवेल शहर पोलिसांनी एसटी बसचालक मन्सुर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उलवे सेक्टर-८ मधील प्रोग्रेसिव्ह आयकॉन सोसायटीत राहणारा शिवम प्रदीप सिन्हा (२७) हा तरुण उलवे येथून मोटारसायकलवरून वहाळ बाजूकडे भरधाव वेगाने जात होता. यावेळी शिवमचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती गव्हाणफाटा ब्रिजखाली जाऊन पडली. यात शिवम सिन्हा हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in