'उलवे कोस्टल रोड' नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय

आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), जेएनपीटी, नवी मुंबई सेझ आणि आम्र मार्ग यांना अखंडपणे जोडणारी आधुनिक पायाभूत सुविधा उभी करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी उलवे कोस्टल रोड प्रकल्प सर्वात महत्त्वाचा ठरत आहे.
'उलवे कोस्टल रोड' नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय
'उलवे कोस्टल रोड' नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय
Published on

नवी मुंबई : आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), जेएनपीटी, नवी मुंबई सेझ आणि आम्र मार्ग यांना अखंडपणे जोडणारी आधुनिक पायाभूत सुविधा उभी करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी उलवे कोस्टल रोड प्रकल्प सर्वात महत्त्वाचा ठरत आहे. या प्रकल्पाची सुमारे ६० टक्के भौतिक प्रगती झाली असून, तो नियोजित वेळेत पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.

एकूण अंदाजे ७ किलोमीटर लांबीचा सहापदरी (३+३) उन्नत उलवे किनारी मार्ग दोन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. ५.८० किमी किनारी महामार्ग आणि ०.९०३ किमी लांबीचा थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणारा एअरपोर्ट लिंक रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग नवी मुंबईला जागतिक व्यापार, गतीमान वाहतूक आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीचे प्रमुख प्रवेशद्वार बनवेल.

देशातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प आणि सर्वात लांब सागरी पुलाला जोडणारा उलवे कोस्टल रोड हा नवी मुंबईच्या नागरी विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. दूरदृष्टी, शाश्वत अभियांत्रिकी आणि सुयोग्य नागरी नियोजनाची उत्कृष्ट सांगड या प्रकल्पातून दिसून येते.

सध्याच्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच परिसराच्या एकूण आर्थिक विकासाला गती देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. पूर्ण झाल्यानंतर उलवे कोस्टल रोड नवी मुंबईच्या परिवहन व्यवस्थेला सक्षम बनवणारा आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला नवी चालना देणारा ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प ठरेल.

विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

वाहतूककोंडी कमी होण्यासही मोठी मदत

या मार्गामुळे MTHL, NMIA आणि आम्र मार्ग यांदरम्यान सिग्नलमुक्त आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे. तसेच पाम बीच रोड, आम्र मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ३४८वरील वाहतूककोंडी कमी होण्यासही मोठी मदत होईल. सुधारीत कनेक्टिव्हिटीमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई प्रवासकाळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवासी, लॉजिस्टिक्स आणि उद्योग क्षेत्रासाठीही ही मोठी दिलासादायक योजना ठरणार आहे.

प्रवास अधिक वेगवान

प्रकल्पाच्या मजबुतीसाठी उड्डाण पूल, मोठे पूल, रेल्वे ओव्हरब्रिज आणि विविध तांत्रिक संरचना उभारण्यात येत आहेत. प्रीफॅब्रीकेटेड व्हर्टिकल ड्रेन्स (PVDs), दगडी खांब, आणि NMIA प्रकल्पस्थळ येथून प्राप्त भराव साहित्याचा वापर करून अत्याधुनिक ग्राऊंड-इम्प्रुव्हमेंट तंत्रज्ञान लागू केले जात आहे. संपूर्ण मार्गावर ऊर्जा-कार्यक्षम एलइडी दिवे, स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग, ॲन्टी-क्रॅश बॅरिअर्स यांसह आधुनिक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, सुगम आणि वेगवान होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in