
नवी मुंबई : बुधवारी पहाटे उरण-बेलापूर मार्गावर उलवे येथे डंपरवर पाठीमागून भरधाव आयशर टेम्पो धडकल्याने भयंकर अपघात झाला. यात टेम्पोचालक व क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतक टेम्पोचालकाचे नाव उमेश सदनानंद उतेकर (४५) आणि क्लिनरचे नाव सयोग राजेंद्र पवार (२५) आहे. हे दोघे मंगळवारी रात्री रत्नागिरीहून माल घेऊन भिवंडी येथे पोहोचविण्यासाठी जात होते. बुधवारी पहाटे सुमारे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास उलवे ब्रीजवर रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी डंपर रस्त्यालगत निष्काळजीपणे उभा ठेवण्यात आला होता.
भरधाव टेम्पोचालकाने डंपरला जोरदार धडक दिली, या धडकेत टेम्पोच्या केबिनमध्ये बसलेले दोघेही चिरडले गेले व जागीच मृत्यू झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या उलवे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.
तपासात आढळले की, डंपर रस्त्याबाहेर आणि बॅरिकेट्स लावलेल्या ठिकाणच्या बाहेर उभा ठेवण्यात आला होता. त्यामुळे पाठीमागून भरधाव टेम्पोचालकाला डंपरचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. उलवे पोलिसांनी डंपरचालकाला जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.