उरण-बेलापूर लोकल ट्रेनमुळे उरणचा विकास गतिमान

उद्योगांपासून काहीसा मागास राहिलेल्या उरण पूर्व भागात देखील आत्ता विकास होऊ लागला आहे.
उरण-बेलापूर लोकल ट्रेनमुळे उरणचा विकास गतिमान

उरण : जेएनपीएमुळे आणि त्या अनुषंगाने या परिसरात आलेले उद्योगधंदे यामुळे उरण तालुका हा सध्या उद्योगधंद्याचे आणि गुंतवणूकदारांचे केंद्र बनले आहे. त्यातच आत्ता उरण तालुक्याला थेट मुंबईला जोडणारी मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे उरण तालुका आत्ता मुंबईशी जोडला गेला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात उरण तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असून तालुक्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस सारख्या प्रकल्पामुळे उरण तालुक्याला सुबत्ता आली आहे. जेएनपीटी स्थापन झाल्यानंतर तर येथे उद्योगधंद्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या परिसरात हजारो नोकऱ्या आणि रोजगार निर्माण झाले आहेत. आत्ता तर लोकल ट्रेन आणि अटल सेतूमुळे उरण थेट मुंबईला जोडला गेला असल्याने उरणला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. रेल्वेमुळे प्रवास सुखकर आणि स्वस्त झाल्यामुळे चाकरमान्यांना मुंबईला नोकरी, व्यवसायासाठी मुंबईला जाणे स्वस्त झाले आहे.

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात उभारण्यात आलेल्या घरांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. एकेकाळी फक्त शेतीप्रधान असलेल्या या तालुक्याची ओळख आत्ता उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेला तालुका म्हणून झाली आहे.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ हे उरण तालुक्यालगतच असल्यामुळे येथे त्या अनुषंगाने देखील विकास होणार आहे. न्हावा-शिवडी सिलिंक, उरण-नेरूळ रेल्वे, मल्टी मॉडल कॉरिडॉर व तालुक्यातील दोन्ही राष्ट्रीय मार्गांचे रुंदीकरण या मुळे दळणवळणाच्या व वाहतूकीच्या सुविधा वाढणार आहेत. त्यामुळे येथील दळणवळण अधिक जलद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्योगांपासून काहीसा मागास राहिलेल्या उरण पूर्व भागात देखील आत्ता विकास होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात उरण तालुक्याचा पूर्ण चेहरामोहराच बदलला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in