राजकुमार भगत / उरण
मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढावी यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असताना देखील राज्यात मराठी शाळांध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण तालुक्यात देखील तीच परिस्थिती आहे. उरण तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील शैक्षणिक वर्षात ४ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर यावर्षी ४ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांची घसरत चाललेली पटसंख्या रोखण्यासाठी जिल्हा परिषद व मराठी माध्यमांच्या शाळांनी विविध सवलती आणि उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रायगड शिक्षण विभागाने पालकांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी यंत्रणा व जनजागृती करण्यावर भर दिला आहे.
शाळा प्रवेशोत्सव, शाळा पूर्वतयारी मेळावा, स्टॉल यांसारख्या योजना राबवून विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे जि.प. शाळातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना नगर परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी वाढत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. गेल्यावर्षी न.पा. शाळेत १६५ विद्यार्थी होते तर यावर्षी १६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उरण तालुक्यातील नऊ शाळा या आदिवासी वाड्यांवर भरतात. या वाड्यांवरचे विद्यार्थी आश्रम शाळांमध्ये शिकत असल्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असते. उरण तालुक्यातील जासई शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या शाळेत ५५० विद्यार्थी शिकत आहेत. कृतिशील प्रयोग राबवूनही शाळेतील विद्यार्थ्यांचा टक्का दिवसागणिक घसरत आहे. त्यामुळे सर्वाधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा, याकरिता जिल्ह्यातील शिक्षण विभाग प्रयनशील आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत यावे याकरिता अध्ययन तंत्रज्ञानाच्या आधारे आंनददायी शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर विनामूल्य प्रवेश, मध्यान्ह भोजन, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, नियमित आरोग्य तपासणी, याचबरोबर डिजिटल इंटरॲक्टिव्ह तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, प्रत्येक शाळेत पाहिलीपासून सेमी इंग्रजी, आयएसओच्या धर्तीवर शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
१५ वर्षांत ४० टक्क्यांनी घट
उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ शाळा आहेत, तर उरण नगर परिषदेच्या ३ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या गेल्या १५ वर्षांत ४० टक्क्यांनी घटली आहे, तर तालुक्यातील खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा मात्र तुडुंब भरू लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या शाळांना बसला असून एकच वर्ग मोठ्या मुश्किलीने चालविण्यात येत आहे. उरण परिसरातील जिल्हा परिषदेच्या व मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घसरू लागली आहे. त्यामुळे ही संख्या आणखी खाली जाऊ नये म्हणून मराठी शाळा व्यवस्थापनाने विशेष योजना जाहीर केल्या आहेत.
यावर्षी उरण तालुक्यातील मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. मात्र आमच्या विभागातर्फे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात असून त्यामुळे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. – प्रियंका पाटील (गट शिक्षण अधिकारी, उरण)