उरणमध्ये अवैध मासेमारी बेतली जीवावर; आवरे येथील खलाशी बेपत्ता

पावसाळी मासेमारी बंदीचा आदेश लागू असतानाही उरण परिसरात सुरू असलेल्या अवैध मासेमारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेले आवरे गावातील खलाशी संगम भार्गव गावंड हे संशयास्पद बेपत्ता झाले असून, त्यांच्या कुटुंबाने घातपाताचा गंभीर संशय व्यक्त केला आहे.
उरणमध्ये अवैध मासेमारी बेतली जीवावर; आवरे येथील खलाशी बेपत्ता
उरणमध्ये अवैध मासेमारी बेतली जीवावर; आवरे येथील खलाशी बेपत्ता प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

उरण : पावसाळी मासेमारी बंदीचा आदेश लागू असतानाही उरण परिसरात सुरू असलेल्या अवैध मासेमारीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेले आवरे गावातील खलाशी संगम भार्गव गावंड हे संशयास्पद बेपत्ता झाले असून, त्यांच्या कुटुंबाने घातपाताचा गंभीर संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगम गावंड हे रविवार, २ ऑगस्ट रोजी ‘महालक्ष्मी’ बोटीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आठवडाभर उलटल्यानंतर, म्हणजे रविवारी कुटुंबीयांना संगम गावंड बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली.

शासनाच्या नियमानुसार १२ नॉटिकल मैलांपेक्षा जास्त अंतरावर मासेमारी करण्यासाठी केंद्राचा अधिकृत पास असणे बंधनकारक आहे. मात्र, कोणताही पास नसताना ‘महालक्ष्मी’ ही बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मासे पकडल्यानंतर ही नौका वशेणी खाडीत नांगरण्यात आली. विशेष म्हणजे, संगम गावंड बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांना तातडीने न देता, बोटीतील सर्व मासे विकल्यानंतर बऱ्याच वेळाने देण्यात आली. एवढेच नव्हे तर बोटीवरील नाखवा आणि इतर खलाशी याप्रकरणी परस्परविरोधी माहिती देत आहेत. कोणी संगम गावंड हे वशेणी खाडीत पडून बेपत्ता झाल्याचे सांगत आहे, तर कोणी ते वशेणी येथून घरी जाण्यासाठी निघून गेल्याचा दावा करत आहे. खलाशांच्या या संशयास्पद आणि वेगवेगळ्या उत्तरांमुळे कुटुंबीयांच्या संशयात भर पडली असून, यात नक्कीच काहीतरी काळेबेरे किंवा घातपात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. उरण तालुक्यात बंदीच्या काळातही मोठ्या प्रमाणावर अवैध मासेमारी सुरू असते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in