उरण : वाहतूककोंडी फोडायला जेएनपीए अध्यक्ष सरसावले; बेकायदेशीर यार्ड आणि वेअरहाऊसवर होणार धडक कारवाई

गव्हाणफाटा-दिघोडे आणि दास्तान-दिघोडे या मार्गावर रोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अखेर जेएनपीएचे नवनियुक्त चेअरमन गौरव दयाळ सरसावले आहेत.
उरण : वाहतूककोंडी फोडायला जेएनपीए अध्यक्ष सरसावले; बेकायदेशीर यार्ड आणि वेअरहाऊसवर होणार धडक कारवाई
उरण : वाहतूककोंडी फोडायला जेएनपीए अध्यक्ष सरसावले; बेकायदेशीर यार्ड आणि वेअरहाऊसवर होणार धडक कारवाई
Published on

उरण : गव्हाणफाटा-दिघोडे आणि दास्तान-दिघोडे या मार्गावर रोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अखेर जेएनपीएचे नवनियुक्त चेअरमन गौरव दयाळ सरसावले आहेत.

या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी स्वतः जेएनपीएचे अधिकारी आणि नवी मुंबईचे वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल खाडे यांच्या समवेत उरण पूर्व भागातील वाहतूककोंडी होणाऱ्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. वाहतूककोंडीसाठी प्रामुख्याने जबाबदार असणाऱ्या बेकायदेशीर कंटेनर यार्ड, वेअरहाऊस आणि सीएफएसवर कडक कारवाई करण्याचे थेट संकेत दिले असून, या परिसरातील अनधिकृत कंटेनर यार्ड बंद करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तालुक्यातील दोन्ही मार्गांवर गेल्या अनेक वर्षांपासून रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अनेक कंटेनर यार्ड, वेअरहाऊस आणि सीएफएस आहेत, मात्र या कंपन्यांकडे अवजड वाहने पार्क करण्यासाठी स्वतःची कोणतीही सोय नाही. परिणामी, ही अवजड वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात. ज्यामुळे हे रस्ते कमालीचे अरुंद होऊन तिथे नेहमीच वाहनांची प्रचंड गर्दी असते. या वाहतूककोंडीचा मोठा त्रास रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि नोकरदार वर्गाला सहन करावा लागत असून, त्यांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागते. उरण पूर्व भागातील नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पार्किंग प्लाझा उभारणार

जांभूळपाडा येथे भव्य पार्किंग प्लाझा उभारण्यात येणार असून, अनधिकृत कंटेनर यार्ड व वेअरहाऊसवर धडक कारवाई केली जाईल. तसेच अधिकृत सीएफएस आणि एमटी यार्डांवर काही कडक निर्बंध लादण्यात येतील. यासोबतच रस्ते रुंदीकरण करणे आणि दिघोडा-दास्तान रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी वॉर्डनची संख्या वाढवण्याची मागणीही यात करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in