उरण खारकोपर रेल्वेला १२ जानेवारीचा मुहूर्त ?

उरण रेल्वेचा खारकोपर-उरणच्या दुसऱ्या टप्प्याचे जवळ जवळ सर्व कामे पूर्ण झाली आहेत. काही किरकोळ कामे शिल्लक असली तरी या रेल्वे मार्गावर लोकल धावण्यासाठी सज्ज आहे.
उरण खारकोपर रेल्वेला १२ जानेवारीचा मुहूर्त ?

राजकुमार भगत/ उरण

मागील कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या उरण-नेरूळ रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन येत्या १२ जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमएमआरडीएच्या न्हावा-शिवडी अटल सेतू प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारीला नवी मुंबईत येणार असल्याने त्याच कार्यक्रमात उरण रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला असल्यामुळे आणि लवकरच लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे या प्रकल्पाचे उद्घाटन उरकण्याची घाई मध्य रेल्वेकडून केली जाईल, असे म्हटले जात आहे. जेएनपीटीमुळे उरणला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. हजारो रोजगार, नोकऱ्या या भागात निर्माण झाल्या आहेत.

रोज हजारो कामगार मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून उरणला येत असताना त्यांना रस्ते वाहतुकीशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यातच रोज होणारी वाहतूककोंडीमुळे तासन‌्तास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत असे. रेल्वे सुरू झाल्यानंतर वाहतूककोंडी आणि अपघातांच्या समस्या कमी होणार आहेत.

सध्यातरी कोणतीही अडचण नाही

उरणच्या विकासाचा मैलाचा दगड ठरणारी उरण-खारकोपर रेल्वेच्या चाचण्या होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. नेरूळ आणि उरण दरम्यानच्या चौथ्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील कामांचे स्टेशन आणि इतर कामे आता पूर्ण झाली आहेत. या मार्गावर लोकल रेल्वे धावण्यात सध्यातरी कोणतीही अडचण नसल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. मार्च १० रोजी या रेल्वेची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर या रेल्वच्या अनेक चाचण्या पार पडल्या. रेल्वेच्या कमिशनर ऑफ सेफ्टीकडून या मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल, पूल, स्टेशन या सोयींचा देखील अभ्यास करण्यात आला आहे. या मार्गावरून अनेक वेळा चाचणीसाठी धावलेल्या रेल्वेला यामध्ये कुठेही अडचणी जाणवल्या नाहीत. अनेक चाचणी रेल्वेच्या फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत

नावाचा प्रश्न मात्र अद्यापही कायम

२७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावर नेरूळ, सीवूड, सागर संगम, बेलापूर, तरघर, बामण डोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे सुरू करण्यात आली होती. सिडकोच्या अखत्यारितील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील रेल्वे धावण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र खारकोपर ते उरण हा मार्ग अद्याप सुरू झालेला नाही. खारकोपर ते उरण रेल्वेच्या टप्प्यातील जवळ जवळ सर्वच स्थानकांच्या नावाचा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही.

उरण रेल्वेचा खारकोपर-उरणच्या दुसऱ्या टप्प्याचे जवळ जवळ सर्व कामे पूर्ण झाली आहेत. काही किरकोळ कामे शिल्लक असली तरी या रेल्वे मार्गावर लोकल धावण्यासाठी सज्ज आहे. रेल्वे विभागाने पंतप्रधान कार्यालयाला ज्या प्रकल्पांचे उद्घाटनाचे प्रस्ताव पाठविले आहेत, त्यामध्ये खारकोपर-उरण रेल्वेचा प्रस्ताव देखील आहे. मात्र आजपर्यंत तरी पंतप्रधान कार्यालयातून याबाबत कोणतीही सूचना आम्हाला आलेली नाही. मात्र त्याबाबत निरोप कधीही येण्याची शक्यता आहे.

-स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

logo
marathi.freepressjournal.in