राजकुमार भगत/ उरण
उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडली आहे. भाजपने शिवसेना (शिंदे गट)ला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेतल्याचा आरोप करत शिवसेना–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीने स्वतंत्र मार्ग स्वीकारला असून नगराध्यक्ष पदासाठी रुपाली तुषार ठाकूर यांनी सोमवारी शेवटच्या दिवशी मोठ्या शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना उपनेते सुहास सामंत, जिल्हाप्रमुख अतुल भगत, उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्या उपस्थितीत रुपाली ठाकूर यांनी तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव कदम यांच्या कार्यालयात अर्ज सादर केला. याचबरोबर सहा नगरसेवकपदांसाठी देखील अर्ज दाखल करण्यात आले.
भाजपने युतीधर्म पाळला नाही आणि आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप करत शिंदे गटाने ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली. माजी नगरसेवक तुषार ठाकूर यांच्या पत्नी रुपाली ठाकूर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
या कार्यक्रमास तालुकाप्रमुख दीपक ठाकूर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रीतम सुर्वे, जिल्हा संघटिका मेघा दमडे, विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, खासदार श्रीरंग बारणे तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आज अखेर नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ अर्ज दाखल झाले असून शेवटच्या दिवशी रूपाली ठाकूर यांच्यासोबत शेख नसरीन इशरद यांनीही आपला अर्ज दाखल केला. २१ नगरसेवक पदांसाठी ८० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्याने उरण नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी ते चौरंगी लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.