

उरण : उरण तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एमआयडीसीच्या रानसई धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला असून, आता धरणातील मृत साठ्यातून (डेड स्टॉक) पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. धरणात अवघे काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा रानसई धरणाची पाणीपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १० फुटांनी घटली असून, धरणाने गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २४ दिवस आधीच तळ गाठल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उरण तालुक्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
१९७० च्या दशकात निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये उभारण्यात आलेले रानसई धरण सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून, त्याची एकूण पाणी साठवण क्षमता १० दशलक्ष घनमीटर आहे. उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद तसेच ओएनजीसी आणि बीपीसीएलसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून आहे.
गेल्या काही वर्षांत उरण परिसरात औद्योगिकीकरणाचा वेग वाढल्याने पाण्याची मागणीही लक्षणीय वाढली आहे. सध्या तालुक्याला दररोज सुमारे ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. मात्र, मागील वर्षी पावसाने लवकरच विश्रांती घेतल्यामुळे धरणातील पाणीसाठा अपेक्षेपेक्षा वेगाने कमी झाला.
सद्यस्थितीत धरणाची पातळी ८५ फुटांच्या खाली गेली आहे. प्रत्यक्षात ८७.५ फूट पातळीवर धरण मृत साठ्यात प्रवेश करते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट होत आहे. दरम्यान, उरणकरांवर तीव्र पाणीटंचाईची वेळ येऊ नये आणि पुढील काही आठवड्यांचे नियोजन सुरळीत राहावे यासाठी एमआयडीसीने सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज ४ एमएलडी पाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्ञानदेव सोनावणे, उपअभियंता एमआयडीसी
तालुक्यातील नागरिकांना ३० जूनपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रानसई धरणातून ३६ एमएलडी आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून ४ एमएलडी असे मिळून एकूण ४० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.
ज्ञानदेव सोनावणे, उपअभियंता एमआयडीसी
आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात
उपलब्ध पाणीसाठा पुढील महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे.