

उरण : एप्रिलच्या सुरुवातीलाच उरण तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा झपाट्याने घटत आहे. रानसई आणि पुनाडे या प्रमुख धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दोन ते अडीच महिने मान्सून येईपर्यंत हे पाणी पुरवून वापरण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे उरणमध्ये पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या या दोन्ही धरणांमधून दररोज सुमारे ३८ दशलक्ष लिटर पाणी उपसा केला जात असून, वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे.
मात्र, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता उरणकरांकडून जोर धरत आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे उरणमधील काही भागांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
यावर्षीही रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाटी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, मार्गाची वाडी तसेच चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचा माळ आणि चांदायणी वाडी या सहा आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. चिरनेर ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली असून, त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
धरणनिहाय स्थिती
रानसई धरण : जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे.
पुनाडे धरण : लघुपाटबंधारे विभाग आणि ‘पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा समिती’वर साठा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
उरण पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठे कमी होत आहेत. टंचाईग्रस्त भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रुपाली म्हात्रे, उपअभियंता जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग