नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांवरून माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद चिघळला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबर रोजी कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. त्यामुळे काही काळ बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नियम तसेच आरोग्याच्या कारणास्तव माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्यास नकार दिला जात आहे. त्याअनुषंगाने १ ऑक्टोबर रोजी माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारून ओव्हरलोड म्हणजेच अधिक वजनाच्या गोण्यांनी भरलेल्या गाड्या खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी व्यापाऱ्यांनी कांदा-बटाटा बाजारातील दुकाने बंद ठेवली.
बाजारात ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांनी भरलेल्या अनेक गाड्या उभ्या असल्याने कामकाज करणे शक्य नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या प्रश्नावरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमधील वाद अधिक तीव्र झाला.
७ ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक
वाढता तणाव लक्षात घेऊन एपीएमसी प्रशासनाने तातडीने मध्यस्थी केली. त्यानंतर नरेंद्र पाटील आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी एपीएमसीच्या सचिवांसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान सचिवांनी संबंधित मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार, ७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात या प्रश्नावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यातील वजनाच्या प्रश्नावर चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेऊन परिस्थिती शांत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
काही काळ वाहतुकीवरही परिणाम
बाजार बंद असल्याची माहिती मिळताच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत माथाडी कामगार ५० ते ५३ किलोपर्यंत वजनाच्या गोण्या खाली करण्यास तयार असताना बाजार बंद ठेवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला. यानंतर नरेंद्र पाटील यांनी बाजाराबाहेर उभ्या असलेल्या गोण्यांनी भरलेल्या गाड्या बाजारात घेण्याच्या मागणीसाठी समर्थकांसह रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.