
नवी मुंबई : वाशी गाव खाडीकिनारा आता पुन्हा हिरवाईने नटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. कांदळवन विभागाने या ठिकाणी सुमारे १० एकरमध्ये नव्याने कांदळवन क्षेत्र निर्माण करण्याची पावले उचलली असून २५ मार्चपासून कांदळ राडारोडा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा राडारोडा रस्त्यांच्या कामासाठी वापरावा, अशी विनंती मनपाला करण्यात आली आहे.
वाशी गावानजीक असलेल्या खाडीकिनाऱ्याचा मोठा भाग राडारोडा टाकणाऱ्यांनी व्यापला होता. गेले अनेक दशक राडारोडा टाकल्याने मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट झाले होते. डेब्रिज माफिया एरिया म्हणून ओळख असणाऱ्या सर्वे क्रमांक सतरा येथे प्रचंड राडारोडा पडला होता, त्यात वरचेवर भर पडत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. त्यात या ठिकाणी अनधिकृत पाने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती.
याच ठिकाणी पुन्हा नव्याने कांदळवन उभे करण्याची पाऊले कांदळवन विभागाने उचलण्यास सुरवात केली आहे. ४.२० हेक्टर म्हणजेच सुमारे दहा एकर परिसरपैकी २. ९ हेक्टरवर कांदळवन उभा करण्यास सुरुवात २५ मार्चपासून करण्यात आली आहे. सध्या हा राडारोडा काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. या ठिकाणी कांदळ रोपे लावण्यात येणार आहेत, तर समुद्री वनस्पती असलेले तिवर हे नैसर्गिकरीत्या उभे राहतील.
या ठिकाणी पडलेला राडारोडा हटवून एका ठिकाणी जमा करण्यात येत आहे. तो राडारोडा घणसोली ऐरोली येथील रस्त्यांच्या कामासाठी वापरावा, अशी विनंती नवी मुंबई मनपाला कांदळवन विभागाने केली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद नवी मुंबई मनपाने दिला आहे.
५० गुंठ्यांवर राडारोडा
जून २०२३ ला असाच प्रयोग करण्यात आला होता, जो यशस्वी झाला आहे. वाशी स्टेशननजीक सर्व्हे क्रमांक ८४० येथे सुमारे ५० गुंठे जागेवर राडारोडा टाकण्यात आला होता. वर्षानुवर्षे हेच सुरू असल्याने झाडे मृत झाली होती, तर पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. त्या ठिकाणीही पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात आला आणि कांदळवन लागवड करण्यात आली होती, आज या ठिकाणी पूर्ण वन उभे राहिले आहे.
वाशी गावानजीक कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला होता तसेच मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी कांदळवन नष्ट झाले तेथील राडारोडा काढण्यात आला आहे. तिथे वनक्षेत्र पुन्हा निर्मिती सुरू करण्यात आली आहे. येथील राडारोडा एका ठिकाणी जमा करण्यात आला असून तो रस्ते कामासाठी वापरण्यात यावा, अशी विनंती मनपाला करण्यात आली आहे.
- सुधीर मांजरे, कांदळवन अधिकारी