

नवी मुंबई : वाशीतील जुहूगावात मुलानेच आपल्या ६५ वर्षीय आईचा गळा आवळून आणि फरशीवर डोके आपटून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महेश रत्नाकर कदम (४२) असे आरोपी मुलाचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याला अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेतील मृत वृद्धेचे नाव नंदा रत्नाकर कदम (६५) असे असून त्या वाशी सेक्टर-११ जुहूगाव येथील अष्टविनायक सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर रूम नं. ३०३ मध्ये मुलगा महेश रत्नाकर कदम त्याची पत्नी व नातवंडासह राहत होत्या. मृत नंदा कदम यांचे घरगुती कारणावरून आपल्या सुनेसोबत नेहमी भांडण होत होते. आई आपल्या पत्नीला महत्त्व न देता ती केवळ बहिणीला महत्त्व देऊन तिचा संसार पाहत असल्याचा महेशचा समज झाला होता. रविवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद होऊन भांडण झाले.
या भांडणाच्या वेळी आरोपी महेशने आई आपल्याला नांदू देत नसल्याचा राग मनात धरून त्याने आईचा गळा आवळला. तसेच तिचे डोके फरशीवर आपटून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नंदा कदम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपी महेश कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.