

नवी मुंबई : वाशी सेक्टर-९ परिसरातील एका स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायाचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून स्पाची मालकीण आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी सेक्टर-९ येथील अदिती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्पामध्ये ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांकडून बेकायदेशीर स्वरूपाचे काम करून घेतले जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २९ मे रोजी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर मिळालेल्या सांकेतिक इशाऱ्यानुसार पोलिसांच्या पथकाने संबंधित स्पावर छापा टाकला.
कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच स्पाची मालकीण सविता संतोष जैस्वाल (४७) आणि व्यवस्थापक विनायक लहु कांबळे (३०) यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक फायद्यासाठी महिलांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.