वाशी टोलनाक्यावर दुहेरी लूट; टोल व्यवस्थापनाला मनसेची समज

सदरचा प्रकार सरळसरळ नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेने केला आहे. रोज लाखो वाहने वाशी टोलनाकामधून ये-जा करत असतात. प्रत्येक वाहनाला दुपटीने टोल आकारून टोल प्रशासन नागरिकांची फसवणूक करून गडगंज पैसा बेकायदेशीर मार्गाने जमा करत आहे.
वाशी टोलनाक्यावर दुहेरी लूट; टोल व्यवस्थापनाला मनसेची समज
Published on

नवी मुंबई : मनसेकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर उर्फ यांच्याकडून आलेल्या तक्रारीनुसार वाशी टोलनाक्यावर नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे, असे निदर्शनास आले आहे. फास्टॅग तांत्रिक अडचणीमुळे स्कॅन होत नाही, असे कारण देत टोल कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम मागितली जाते. रोख पैसे दिल्यानंतर थोड्या वेळाने नागरिकांना त्यांच्या फास्टॅग खात्यामधून देखील घेतली गेल्याचे लक्षात येते. नागरिकांना यामुळे एका टोलसाठी दुप्पट भुर्दंड सोसावा लागत आहे.

सदरचा प्रकार सरळसरळ नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेने केला आहे. रोज लाखो वाहने वाशी टोलनाकामधून ये-जा करत असतात. प्रत्येक वाहनाला दुपटीने टोल आकारून टोल प्रशासन नागरिकांची फसवणूक करून गडगंज पैसा बेकायदेशीर मार्गाने जमा करत आहे.

टोल प्रशासनाने सदर प्रकार तत्काळ थांबवावा, यासाठी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वाशी टोलनाक्यावर धडक दिली. तांत्रिक कारणामुळे फास्टॅग मशीन बंद असल्यास फास्टॅग खात्यामध्ये पैसे शिल्लक असलेल्या नागरिकांकडून रोख पैसे न घेता फास्टॅग नंबरच्या आधारे काही वेळानंतर टोल आकारावा आणि त्या वेळेत टोल न आकारता वाहन सोडण्यात यावे, असा शासन निर्णय आहे. मग, वाशी टोल प्लाझावर याची अंमलबजावणी का होत नाही? असा प्रश्न गजानन काळे यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसेतर्फे जशास तसे उत्तराचा इशारा

नागरिकांची लूट थांबवावी. तसेच त्या संदर्भातील माहिती फलक प्रत्येक टोल बुथवर दर्शनी भागात लावावा, अशी आग्रही मागणीही मनसेने केली. तसेच अशा पध्दतीने दुप्पट पैसे ज्या नागरिकांकडून जमा केले असतील, त्यांच्या खात्यावर ते तात्काळ वर्ग करावेत. अन्यथा वाशी टोल प्रशासनाला मनसेतर्फे जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसेतर्फे टोल व्यवस्थापनाला दिला.

logo
marathi.freepressjournal.in