नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोरट्यांना अटक

नवी मुंबई पोलिसांनी वाहन चोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.
नवी मुंबई पोलिसांकडून वाहन चोरट्यांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी वाहन चोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे भंगार गाड्यांचे चेसी क्रमांक मिळवून तो क्रमांक चोरी केलेल्या गाड्यांना लावत राज्याबाहेर गाड्या विकत होते. सदर तपास गुन्हे शाखेने केला आहे.

वाहन चोरीच्या घटनेतील वाढ पाहता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेने वाहन चोरी प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सुरु केला. यात घटनास्थळी पुन्हा भेट देत, प्रत्यक्षदर्शी व्यक्ती शोध घेत बोलते करणे, सीसीटीव्ही पाहणी करणे सुरू केले, असा प्रयत्न सुरू केल्यावर त्यांना ११ जानेवारीला रबाळे पोलीस ठाणे हद्दीत गाडी चोरी करताना आरोपी आढळून आला. तेच आरोपी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अन्य गाड्या चोरी करतानाही आढळून आले. त्या आरोपींची पाहणी करून जुने अभिलेख तपासले असता, गाडी चोरी करणाऱ्यांपैकी मोहम्मद फैज अकबर अली शेख या आरोपीची ओळख करीत त्यानंतर तांत्रिक तपास केला असता सदर आरोपी उत्तरप्रदेश मधील मेरठ येथे असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. नवी मुंबईत आणल्यावर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसरा आरोपी मोहम्मद शमीम मो. शफी शेख याला साकी नाका येथून अटक केली. या दोन्ही आरोपींना कोठडीत चौकशी पोलिसांनी सुरू केल्यावर अन्य दोन आरोपींची नावे समोर आली. या टोळीत चार आरोपी असून दोन अद्याप फरार आहेत. चौघांनी मिळून जानेवारीत नवी मुंबई, मुंबई व ठाणे पसिरात पाच गाड्या चोरी केल्याची कबुली अटक आरोपींनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in