उरणमध्ये दोन दिवसांची पाणीकपात सुरू

एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील ग्रामपंचायतींना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
उरणमध्ये दोन दिवसांची पाणीकपात सुरू
Published on

उरण : एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील ग्रामपंचायतींना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीने दिली आहे.

उरणच्या रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पावसाळ्यातील साडेतीन महिन्यांचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना डिसेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेक वर्षांपासून धूळखात पडला आहे.

उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकरांना दररोज ४१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासत असते. मात्र एमआयडीसीकडे केवळ ३० दशलक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज १० दशलक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणीपुरवठा जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पाणीकपात केली जात आहे. दरम्यान, एमआयडीसीकडून उरणकरांना पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सिडकोकडून पाणी घेतले जाते. त्या बदल्यात एमआयडीसीकडून सिडकोला पाणी दिले जाते, यात सिडकोकडून ३.८ दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते.

रानसई धरणातील पाणी उन्हाळ्यात आणि जूनपर्यंत पुरवठा करता यावा, याकरिता याचे नियोजन म्हणून मंगळवारची पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी आठवड्यातील नेहमीची कपात आहे. याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे.

- जी. एन. सोनवणे, उपअभियंता, एमआयडीसी, उरण

logo
marathi.freepressjournal.in