पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

रबाळे पोलिसांनी याप्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह त्याच्या इतर तीन नातेवाईकांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आली
पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
Published on

नवी मुंबई : पतीकडून होत असलेल्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून घणसोलीतील तळवली भागात राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे पोलिसांनी याप्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह त्याच्या इतर तीन नातेवाईकांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आली आहे.

या घटनेतील मृत विवाहितेचे नाव वर्षा किरण पवार (३२) असे असून २०१८ मध्ये तिचा विवाह घणसोलीतील तळवली भागात राहणाऱ्या किरण पांडुरंग पवार (३५) याच्या सोबत झाला होता. लग्नाचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर किरण पवारने वर्षाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ, मारहाण करून तिला सतत सोडचिठ्ठी देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती. वर्षाला दिवस गेल्यानंतर वर्षाला तिच्या आईवडिलांनी माहेरी नेले. त्यानंतर वर्षाला मुलगी झाल्यानंतर किरणला त्याबाबत कळवण्यात आले. मात्र त्याने मुलगी झाल्यामुळे वर्षाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली होती. किरणच्या अशा वागण्यामुळे वर्षाला तिच्या आई वडिलांनी तिला तीन वर्षे माहेरी ठेवले. यादरम्यान किरण फक्त देन वेळेस वर्षाला भेटण्यासाठी गेला होता.

त्यादरम्यान देखील त्याने किरकोळ कारणावरून भांडण करून वर्षाला मारहाण केली होती. वर्षा तीन वर्षे माहेरी राहिल्यानंतर पुढील काळात वर्षाला मारहाण व शिवीगाळ तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे किरण व त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर वर्षा व तिच्या मुलीला किरणसोबत तळवली येथे पाठवून देण्यात आले होते. मात्र तीन चार महिन्यातच किरण पवारने वर्षाला मुलीसह नाशिक चिचवे येथील त्याच्या घरी पाठवून दिले. सदर ठिकाणी वर्षा व तिची मुलगी फक्त दोघीच तीन महिने राहिल्या. त्याठिकाणी देखील किरण पवार याने वर्षाला मारहाण केली होती.

सात-आठ महिन्यांनंतर वर्षाच्या आईवडिलांनी नाशिकमधील जायखेड पोलीस ठाण्यात किरण पवार याच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. अखेर त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून वर्षाने गत १० जानेवारी रोजी तळवली येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वर्षाच्या आई वडिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात किरण पवार याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in