
नवी मुंबई : उलवे भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या अल्पवयीन मुलासह तसेच एका रिक्षाचालकाच्या मदतीने कट करून पतीची निर्घृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह नवी मुंबई विमानतळालगतच्या रस्त्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उलवे पोलिसांनी या हत्येचा छडा लावत पतीची हत्या करणारी महिला व रिक्षाचालक या दोघांना अटक केली आहे. तसेच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आता या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव रेश्मा सचिन मोरे (३५), तर तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव प्रथमेश म्हात्रे (३६) असे आहे. रेश्मा ही पती सचिन देवजी मोरे (४०) व १६ वर्षीय मुलासह उलवे सेक्टर-२३ मधील रेड्डी व्हिला सोसायटीत राहत होती. सचिन हा पत्नी व मुलाला त्रास देत असल्याने रेश्माने त्याचा कायमचा काटा काढण्याची योजना आखली होती. पतीकडुन होत असलेला सततचा हा छळ असह्य झाल्यामुळे पतीची हत्या केल्याची कबुली तिने दिली.