नवी मुंबई : रबाळे येथील भीमनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने किरकोळ कारणावरून एका महिलेला भररस्त्यात शिवीगाळ व मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की व मारहाण करून पलायन केले आहे. अक्षय उर्फ विनोद जाधव (३०) असे या आरोपीचे नाव असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी तसेच विनयभंग केल्याप्रकरणी असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत तसेच त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार पीडित महिला रबाळे परिसरात राहण्यास असून ती सोमवारी सायंकाळी आपल्या मित्रासह रबाळे तलाव येथे फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अक्षय जाधव याने पीडित महिला व तिच्या मित्राला पाठीमागून आपल्या दुचाकीची धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडल्यानंतर पीडित महिलेने त्याला जाब विचारला असता, आरोपी अक्षय जाधव याने उलट पीडित महिलेला शिवीगाळ करून तिच्या पोटात लाथ मारली. त्यानंतर त्याने तिच्या मित्राला देखील मारहाण पीडित महिलेसोबत अश्लील वर्तन केले. त्यामुळे पीडित महिलेने नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर संपर्क साधून त्याठिकाणी पोलिसांना बोलावून घेतले.
त्यांनतर त्याने त्यांच्यासोबत धक्काबुक्की करुन त्या ठिकाणावरून पलायन केले. या प्रकारानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील पीडित महिलेच्या तक्रारीवरून अक्षय जाधव याच्या विरोधात विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी तसेच पोलीस शिपाई कानवडे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.