
मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. सध्या या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील ९ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे.
पनवेल-कर्जत रेल्वेमार्गामुळे एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला २०१८ साली मंजुरी मिळाली. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ५६.८२ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये ४.४ हेक्टर सरकारी जमिनीचा समावेश आहे. या मार्गावरील विविध पुलांचे बांधकाम सुरू आहे. उड्डाणपूल, पादचारी पूल व अतिरिक्त पुलाचे काम सुरू आहे. तसेच मोहापे ते चिखले स्थानकांदरम्यान ७.८ किमी लांबीचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. सध्या या मार्गावर ईयूआर रेकची वाहतूक होत आहे. येथील कामे पूर्ण झाल्यावर कर्जत ते चौक स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाची जोडणी सुरू होणार आहे. यासह पुणे एक्स्प्रेस-वे येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पनवेल-कर्जत मार्गावर पाच स्थानके
मोहापे आणि किरवली येथील प्रमुख ४ उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल ते कर्जत मार्गावर पाच स्थानके तयार होणार आहेत. यामध्ये पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत स्थानकांचा समावेश आहे. पनवेल स्थानकावर स्थानक इमारत, कर्मचारी निवासस्थान, ओव्हरहेड वायर साधनांचे आगार व पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच फलाट, पादचारी पूल यांचे नियोजन आखले जात आहे.