नवी मुंबई : तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. पनवेल तालुक्यातील नेवाळी गाव येथे नवीन इमारतीच्या बांधकाम साइटवर सेंट्रींगचे काम करणाऱ्या विपीन रामचंद्र कुमार (२०) या तरुणाचा सदर इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून खाली पडुन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मृत तरुणाला तेथील ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले साहित्य न पुरविल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव अमित वर्मा असे आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी विपीन कुमार व गोरख कुमार या दोघांना पनवेल तालुक्यातील नेवाळी गाव येथे सेंट्रींगचे काम करण्यासाठी बोलावून घेतले होते. मागील ३ महिन्यांपासून हे कामगार नेवाळी येथील केदारनाथ या नवीन बिल्डिंगचे काम करत होते. गत २१ फेब्रुवारी रोजी विपीन व गोरख हे दोघे तिसऱ्या मजल्यावरील सेंट्रींगचे लावलेले फ्लाय काढण्याचे काम करत होते. यादरम्यान सायंकाळच्या सुमारास विपीन याचा पाय घसरल्याने तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. यात विपीन गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.