
नवी मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद बसुद्दीन शेख (२३) याने यशश्रीच्या पाठीमागे लग्नासाठी व त्याच्यासोबत बंगळुरू येथे येण्याचा तगादा लावला होता. मात्र यशश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती, याच कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर आरोपी दाऊद शेखने यशश्रीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांनी दिली. बुधवारी सकाळी या आरोपीला पनवेल सत्र न्यायायलात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याचेही काळे यांनी सांगितले.
आरोपी दाऊद आणि यशश्री हे दोघेही शाळेमध्ये एकत्र शिकत होते. दाऊदने दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्याने शाळा सोडून दिली होती. मात्र यशश्री पुढे शिक्षण घेत होती. दाऊदने त्यानंतर चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. २०१९ मध्ये यशश्री अल्पवयीन असताना, त्याने यशश्रीसोबत छेडछाडीचा प्रकार केल्याने यशश्रीच्या कुटुंबीयांनी दाऊदविरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात दाऊद दीड महिने जेलमध्ये होता. त्यानंतर तो जामीन मिळवून बाहेर आल्यानंतर तो कोविडच्या काळात बंगळुरू येथे गेला होता. तो यशश्रीला भेटण्यासाठी उरणमध्ये दोन -तीनवेळी कर्नाटक येथून आल्याचे तपासात आढळून आले आहे. २५ जुलै रोजी यशश्री दाऊदला उरण परिसरातील कोट नाका येथील पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूस असलेल्या झुडपामध्ये भेटल्यानंतर यशश्रीला बंगळुरू येथे त्याच्यासोबत येण्याबाबत विचारणा केली. मात्र यशश्रीने त्याच्यासोबत बंगळुरू येथे जाण्यास नकार दिला, यावरून दाऊदने तिची हत्या केली.
फोटो व्हायरल करण्याची धमकी
गत २३ जुलै रोजी दाऊद कर्नाटक येथून उरणमध्ये आला होता, त्यानंतर यशश्रीने त्याला भेटण्यासाठी यावे यासाठी तो जबरदस्ती करत होता. तसेच ती भेटायला न आल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे २४ जुलै रोजी यशश्री जुईनगर रेल्वे स्थानकात दाऊदला भेटली होती. त्यावेळी त्याने यशश्रीला लग्न करून त्याच्यासोबत बंगळुरू येथे कायमचे राहण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र यशश्री त्याला नकार देत होती. त्यामुळे दाऊदने २५ जुलै रोजी पुन्हा यशश्रीला भेटण्यासाठी बोलावले होते, मात्र यशश्री त्याला भेटण्यास न गेल्याने त्याने यशश्रीचे त्याच्याजवळ असलेले काही फोटो फेसबुकवर अपलोड केले होते.
ॲट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणातील मृत यशश्री शिंदे ही अनुसूचित जातीची असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात आता ॲट्रोसिटीचे कलम वाढवले आहे. त्यानुसार या आरोपीला बुधवारी सकाळी पनवेल येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास हा पोर्ट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून करण्यात येत आहे.