युवकांनो ‘ड्रग्ज फ्री’ समाज घडविण्यासाठी पुढे या! ‘नशामुक्त नवी मुंबई' अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रुशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.
युवकांनो ‘ड्रग्ज फ्री’ समाज घडविण्यासाठी पुढे या!  ‘नशामुक्त नवी मुंबई' अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
एख्स @Dev_Fadnavis
Published on

नवी मुंबई : देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रुशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्ज आणि तत्सम अमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी युवकांनो सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या. ती देखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले.

‘नवी मुंबई पोलीस आयुक्तालय'तर्फे बुधवारी वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित ‘नशामुक्त नवी मुंबई' अभियानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ड्रग्जमुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात, परंतु चांगले करण्यासाठी प्रवाहाविरुध्द जावे लागते. त्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद गरजेची आहे. ‘नशामुक्त नवी मुंबई' अभियान अतिशय महत्वाचे आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत पोलिसांना निर्देश दिल्यानुसार आपल्याला ड्रग्जविरोधात मोठी लढाई लढायची आहे. सरळ लढाई करता येत नाही म्हणून अमली पदार्थांद्वारे देश पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रासह देशात सगळीकडे अमली पदार्थ वेगवेगळ्या मध्यामातून पसरवून देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन करून देश आतून पोखरण्याचा तसेच देशाचे भवितव्य हे युवा अवस्थेत संपवण्याचा डाव सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, प्रसिद्ध अभिनेता तथा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे ‘नशामुक्त नवी मुंबई'चे आयकॉन जॉन अब्राहम, आ. मंदाताई म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, आदी उपस्थित होते.

पुनःश्च एकदा निर्धार करू, या नशामुक्तीसाठी लढण्याचा, ड्रग्ज फ्री नवी मुंबई करण्यासाठी सैनिक व्हा. ‘नशामुक्त नवी मुंबई' अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचेही अभिनंदन. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावे.

- जॉन अब्राहम, अभिनेता

तर चांगल्या कामाचा ध्यास, हीच खरी नशा आहे. सर्वांनी चांगल्या कामाचा ध्यास घ्यावा. नवी मुंबई सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नशामुक्त अभियानातही अव्वल राहील. - आ. गणेश नाईक

टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८८२८११२११२ या टोल फ्री क्रमांकाचा ड्रग्ज विरोधातील मोहिमेत प्रभावी वापर करा, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल नवी मुंबई पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच सेलिब्रिटी म्हणून जॉन अब्राहम यांच्या कामाबद्दलही कौतुक केले.

logo
marathi.freepressjournal.in