
सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
२६/११च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. अमेरिकेतील लॉस एंजिलिसहून तहव्वूर राणा याला प्रत्यार्पित करून एनआयएने नवी दिल्लीत आणल्याने, त्या काळातील रक्तरंजित आठवणी जाग्या झाल्या. या हल्ल्यामागील सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकळे फिरत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणांवर पुन्हा एकदा कठोर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तहव्वूर राणा याला अमेरिकेतून लॉस एंजिलिसमधून मुसक्या बांधून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री नवी दिल्लीत आणले आणि २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा भळाभळा वाहू लागल्या. २६/११चे चित्र डोळ्यासमोर आले आणि त्या सर्व आठवणी जागृत झाल्या. यामधला खरा आरोपी पाकिस्तानमध्ये लपून बसलेला 'मोहम्मद हाफिज' याला जोपर्यंत मुसक्या बांधून फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत मुंबईकरांना समाधान वाटणार नाही. २६/११च्या घटनेचे मूळ सूत्रधार हाफिज व राणा हे दोघे होते. परंतु राणा याचे प्रत्यार्पणा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले. खरे पहायला गेले, तर खटलेबाजी करण्यापेक्षा अमेरिकन सैन्याने पाकिस्तानात जाऊन ओसामा टोळीचा खात्मा केला. त्याप्रमाणे भारताच्या गुप्तचर यंत्रणेने मोहम्मद हाफिज, दाऊई इब्राहीम व इतर दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणे आवश्यक आहे. कसली खटलेबाजी करता? कालचा प्रकार पाहिला ना? राणा याला पटियाला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पहाटे ४.३० वाजता रिमांड दिल्याची माहिती समोर आली. पटियाला हाऊसमध्ये राणा याला ६.३० वाजता नेण्यात आले. खरे पाहू गेल्यास एनआयएने दाखल केलेल्या खटल्यात १० मिनिटांत रिमांड किंवा कस्टडी देणे आवश्यक होते. परंतु त्याला ९.३० तास लागले ही आमची न्याय पद्धती. सामान्यांची काय जाण ठेवणार?
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही तीन दिवस दहशतीच्या सावटाखाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रात्री प्रवासासाठी वाट पाहत असलेल्या प्रवाशांवर गोळीबार करून त्यांना ठार करण्यात आले. कामा हॉस्पिटलमध्ये अंदाधुंद गोळीबार करून नर्सेसना, डॉक्टरांना ठार करण्यात आले. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवले. ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन पॉइंट या ठिकाणी दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला. शेकडो माणसांचे प्राण घेतले. कसाबला फाशी देण्यात आली. किती महिन्यांनी? तेच इस्रायल हे राष्ट्र असते, तर यांनी त्यांचा खात्मा करून टाकला असता. यासाठी मुंबईतून हेलिकॉप्टरमधून एनआयएचे जवान तैनात करण्यात आले. मुळात आमची सुरक्षा यंत्रणाच इतकी ढिली होती की, समुद्रमार्गे आलेले हे दहशतवादी कुणाला दिसलेच नाहीत. दहशतवाद्यांनी निरपराध लोकांचे बळी घेतले. म्हणून म्हणतोय की, त्या २६/११च्या जखमा पुन्हा एकदा भळभळू लागल्या आहेत.
तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करताना खरी कसोटी देशाचे मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांची लागली. आता हा राणा म्हणे पाकिस्तानचा नाही. कॅनडाचा आहे. मात्र मूळ तो पाकिस्तानमधलाच. त्याने खोटी कागदपत्रे करून कॅनडामधील नागरिकत्व मिळवले. पण त्याचे माइंड हे पाकिस्तानी होते आणि त्यामधूनच लष्कर-ए-तोयबा, हाफिज यांचा संबंध आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दहशतवाद्यांनी मुंबईतील मोक्याची ठिकाणे हेरून ठेवली होती, असेच म्हणावे लागेल. ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आले, तर नरिमन हाऊसमध्ये काही इस्रायली नागरिक होते, म्हणून त्यांना लक्ष्य करण्यात आले. मुंबईत आलेल्या या आठ-दहा दहशतवाद्यांनी मुंबई पोलीस यंत्रणेला नामोहरम केले. त्यांचे कारनामे हल्ल्यानंतर पुढे आले आहेत. बेछूट असा गोळीबार दक्षिण मुंबईत होत होता. ताज हॉटेलपासून चौपाटीपर्यंत या दहशतवाद्यांनी मुंबई आपल्या ताब्यात ठेवली होती. याचे सूत्रधार पाकिस्तानमध्ये बसून हालचाली करत होते.
या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. आर. आर. पाटील गृहमंत्री होते, तर विलासराव हे मुख्यमंत्री होते. पुढे या २६/११च्या घटनेची जबाबदारी पकडून राजीनामे द्यावे लागले होते. आर. आर. पाटील यांनी, तर यावर भाष्य करताना अशी छोटी-मोठी घटना होतच असते, असे उद्गार काढले. त्यावरून वादळ उठले. या २६/११च्या घटनेपूर्वी बाबरी मशीद पडल्यानंतर १३ साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये हजारो मुंबईकर मारले गेले; मात्र त्याचा धडा २६/११च्या वेळी घेण्यात आला नाही. आजही त्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या घटनेमधील शेकडो लोक अपंग होऊन पडले आहेत. रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट तर कानठळ्या बसवणारे होते. एकूण मुंबई ही अस्थिर करण्याचा प्रयत्न या दहशतवाद्यांनी केला. हेच बघा ना, ३२ वर्षांनंतर याकूब मेनन या दहशतवाद्यांच्या मालमत्ता आता केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचे आदेश काढण्यात आले. आजही पाकिस्तानमध्ये बसून मुंबईमधील बिल्डर, सिनेमा क्षेत्रातील मंडळी व उद्योगधंद्यातील उद्योगपतींना दाऊद इब्राहिमचे फोन खंडणीसाठी येत आहेत. आजही त्याची गँग सज्ज आहे.
२०१४ ते २०२५ या ११ वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात सरकारे आल्यानंतर या दहशतवाद्यांच्या कारवाया थांबल्याचे दिसते. या दहशतवाद्यांच्या टोळ्यांमध्ये विशेषतः एका समाजाची तरुण मंडळीच मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसते. मुंबईजवळ असलेले मुंब्रा, तसेच भिवंडीजवळ असलेले पडघा हे दहशहतवाद्यांचे अड्डे झाले आहेत; मात्र ते दबा धरून बसले असून, संधीची वाट पाहत आहेत. एनआयएने या दहशतवाद्यांच्या विरोधात एक मोहीम सुरू केली पाहिजे. आता मुंबई बदलत आहे. अनेक लोकोपयोगी कामे सुरू असून, मेट्रोचे जाळे सगळीकडे पसरत आहे आणि अशाच वेळी या दहशतवाद्यांकडे सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. स्थानिक पातळीवर काही विचित्र घटना घडतात. राज्याचे एक माजी मंत्री दाऊद इब्राहिम यांच्या नातेवाईकांची इस्टेट विकत घेत आहेत. एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. आता ते जामिनावर आहेत. एकूण २६/११च्या घटनेनंतर आम्हाला खूप शिकण्यासारखे आहे. सर्व यंत्रणा पारदर्शक बनवणे आवश्यक आहे.
गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी दाऊद टोळीच्या मुसक्या बांधल्या होत्या. नामवंत पोलीस अधिकारी हे दाऊदच्या निशान्यावर होते; मात्र त्यावेळी त्यांनी एक एन्काऊंटर करण्याचा धडाका लावल्यानंतर गुन्हेगारांचे कंबरडे मोडले होते. त्यांच्या काळात दहशतवाद्यांवर कठोर कारवाई होत होती. नामवंत अशा पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळी गुन्हेगारांवर वर्चस्व मिळवले होते आणि त्यांना पळता भुई थोडी केली होती; मात्र त्यानंतर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर गुन्हेगारांनी आपली मान परत एकदा वर काढली. अशा या पार्श्वभूमीवर २६/११ची हादरून टाकणारी घटना घडून गेली आणि आजही त्या आठवणी ताज्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार