विज्ञान आणि राजकीय अंधश्रद्धा

२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. समाजात वैज्ञानिक द्दष्टिकोन पसरावा, कोणत्याही घटनेचे विश्लेषण विज्ञानाच्या आधारे केले जावे, हा उद्देश यामागे आहे. पण प्रत्यक्षात समाजातील अंधश्रद्धांचे प्रमाण वाढते आहे. विशेष म्हणजे राजकीय मंडळीही यात मागे नाहीत. गणपती दूध प्याला, गणपतीची प्लास्टीक सर्जरी झाली इथपासून ते खेकड्यांमुळे धरण फुटले, असे अजब दावे केले जातात.
विज्ञान आणि राजकीय अंधश्रद्धा
Published on

चौफेर

प्राजक्ता पोळ

२८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. समाजात वैज्ञानिक द्दष्टिकोन पसरावा, कोणत्याही घटनेचे विश्लेषण विज्ञानाच्या आधारे केले जावे, हा उद्देश यामागे आहे. पण प्रत्यक्षात समाजातील अंधश्रद्धांचे प्रमाण वाढते आहे. विशेष म्हणजे राजकीय मंडळीही यात मागे नाहीत. गणपती दूध प्याला, गणपतीची प्लास्टीक सर्जरी झाली इथपासून ते खेकड्यांमुळे धरण फुटले, असे अजब दावे केले जातात.

१९२८ मध्ये महान भारतीय वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमन यांनी ‘रमन इफेक्ट’ या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आणि नोबेल जिंकणारे आशियातील ते पहिले वैज्ञानिक ठरले. २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आज या विज्ञान दिनानिमित्त आपल्या समाजात विज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन्ही एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. सामान्य लोकांबरोबरच ज्यांच्यामागे एक जनाधार आहे असे राज्यकर्ते, समाजसेवक यांच्याकडूनही कळत-नकळत विज्ञान आणि अंधश्रद्धेची सांगड घालती जाते. याचा परिणाम लोकांवर होते. आजच्या दिवशी याबाबतचे काही समज-गैरसमज…

२५ वर्षांपूर्वी, म्हणजे २१ सप्टेंबर १९९५ चा दिवस उजाडला तो एक अज्ञानाचे प्रदर्शन घडवणारी अफवा घेऊन. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. खासगी वृत्तवाहिन्याही मोजक्याच होत्या. तरीही गल्लीपासून दिल्लीपर्यंत गणपती दूध पितो ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. मंदिरात दुधाच्या वाट्या घेऊन लोकांच्या रांगा लागल्या. गणपतीच्या सोडेंजवळ दुधाचा चमचा नेला की त्यातले दूध कमी होताना दिसते असे म्हटल्यावर लोक नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना लँडलाइनवरून फोन करून आमचाही गणपती दूध प्याला असे सांगू लागले. आज पन्नाशीत असलेल्या पिढीला याची आठवण नक्की येईल.

काहींनी आपल्या गणपतीची 'परीक्षा' घेण्यासाठी त्या दिवशी ऑफिसमधून लवकर घरी धाव घेतली होती. दुधाच्या पिशव्यांची कधी नव्हे इतकी विक्री त्या दिवशी झाली.

तेव्हा राज्यात युतीचे सरकार होते. शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते. तेव्हा गणपतीला दूध पाजण्याचा हा कार्यक्रम वर्षा बंगल्यावरही पार पडला. आमच्याही गणपतीने दूध प्यायल्याचे मनोहर जोशी यांनी जाहीर केले. एकीकडे पसरलेली अफवा आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी गणपती दूध प्यायलाचे जाहीर केल्यानंतर गृहविभागाची पंचाईत झाली. पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला. त्याचवेळी गृह खात्याचा कार्यभार पाहणारे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी गणपती दूध पीत नसल्याचे जाहीर करून त्या अफवांना पूर्णविराम दिण्याचा प्रयत्न केला.

गणपती दूध पिण्याच्या या प्रकाराला कुणी चमत्कार, तर कुणी शुभ म्हणू लागले. काहींच्या मते हा अपशकुन होता, तर काहींच्या मते फक्त अंधश्रद्धा. मात्र त्यामागचे विज्ञान समजून घेण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. ‘सरफेस टेन्शन’ हे वैज्ञानिक कारण त्यामागे होते. सरफेस टेन्शनमुळे द्रवाचा पृष्ठभाग ताणलेला राहतो आणि त्यामुळे काही गोष्टी पाण्यावर तरंगू शकतात किंवा लहान छिद्रांमधून द्रव वर जाऊ शकतो. हे वैज्ञानिक कारण लोकांना माहिती नव्हे. पण मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय नेत्यांपर्यंत एकानेही हे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

आपल्या समाजात विज्ञान आणि अंधश्रद्धा या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेक वैज्ञानिक कारणांचं रूपांतर अंधश्रद्धेत झाले आहे. विविध स्तरातील लोकांमध्ये विज्ञानाबद्दल समज-गैरसमज आहेत. पण आपला देश किंवा राज्य चालवणाऱ्या राज्यकर्त्यांमध्ये तरी वैज्ञानिक जागरुकता असायला हवी. यासाठीच दूध पिणाऱ्या गणपतीचे दिवंगत मुख्यमंत्र्यांनी केलेले शिक्कामोर्तब हे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे कारण ठरले.

काही वर्षांपूर्वी माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला होता. भिडेंनी शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याच्या सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आणि पार हायकोर्टापर्यंत हे प्रकरण गेले. कालांतराने या गोष्टी मागे पडल्या. पण भिडेंच्या मूठभर समर्थकांना त्यांचा हा दावा खरा वाटला. ही विज्ञानाची केलेली चेष्टा नकळतपणे लोकांच्या मनावर बिंबवली गेली.

या वैज्ञानिक युगाने अनेक अशक्य गोष्टींना क्षणात शक्य केले आहे, ज्यात अंधश्रद्धेला स्थान नाही. विज्ञान आणि अंधश्रद्धा एकमेकांपासून खूप दूर आहेत. परस्पर विरोधी आहेत. पण तरीही या दोन विरोधी संकल्पना विज्ञानाविषयी पुरेशी जागरुकता नसल्याने परस्परांशी जोडल्या जातात. अवास्तव आणि वास्तव, अकल्पनीय आणि कल्पनीय बाबी एकत्र जोडल्या जातात.

वाईट नजर टाळण्यासाठी लिंबू आणि हिरव्या मिरच्यांचा केला जाणारा वापर हा समाजात सामान्यतः दिसून येणाऱ्या अंधश्रद्धांपैकी एक आहे. हा वापर लिंबू आणि मिरच्यांच्या गुणधर्मांमुळे केला गेला असावा. कारण ते दोन्ही वेगवेगळ्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात आणि विशिष्ट आम्लयुक्त वास निर्माण करतात. जे कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच, आपल्या पूर्वजांनी समारंभांमध्ये हे प्रतीक म्हणून वापरले असावे, पण कालांतराने त्याचे रूपांतर अंधश्रद्धेत झाले. घरात वटवाघळांचा प्रवेश म्हणजे अपशकुन मानला जातो. कोणाचा तरी मृत्यू यामुळे होईल अशा समजुती होत्या. अंधश्रद्धेमागील खरे कारण म्हणजे वटवाघळे त्यांच्यासोबत अनेक प्राणघातक आजार घेऊन येतात आणि त्या काळात जेव्हा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या तेव्हा रेबीज, इबोला, निपाह अशा आजारांमुळे लोकांचा मृत्यू होत असे. यामागची वैज्ञानिक कारणे लक्षात न घेता पुढे या अंधश्रद्धा पिढ्यान‌्पिढ्या तशाच राहिल्या. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत राज्यकर्ते, समाजसेवक म्हणवणारे लोक वैज्ञानिक दृष्टिकोन मागे टाकून जादूटोणा, अंधश्रद्धा आणि अज्ञान याला खतपाणी घालताना दिसताहेत. त्यातूनच खेकड्यांनी धरण फोडल्याचा हास्यास्पद दावा आणि आंबे खाऊन अपत्यप्राप्तीचा अजब दावा केल्याचे दिसून येते. ते टाळले पाहिजे.

prajakta.p.pol@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in