४८ वर्षांचा तरुण चित्रपट...

आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या नायकाच्या प्रेमाचा प्रवास बुवाबाजी, गंडे ताईतपासून सुरू होऊन शेवटी कर्नल ज्युलियस नगेंद्रनाथसिंगपर्यंत येऊन संपतो
४८ वर्षांचा तरुण चित्रपट...

-प्रिया भोसले

प्रासंगिक

प्रयोगशील दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांच्या ’छोटी सी बात’ या चित्रपटाला आज (मंगळवार) ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. साधे, रोजच्या जगण्यातील विषय घेऊन बासूदांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. काॅमन मॅन हा त्यांच्या चित्रपटाच्या नेहमीच मध्यवर्ती राहिला. त्यामुळे बासूदांचे चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. ‘छोटीसी बात’ची कथाही आजच्या पिढीलादेखील भुरळ घालणारी आहे. म्हणूनच या चित्रपटाविषयी...

9 जानेवारीला आपल्या अत्यंत आवडत्या बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘छोटीसी बात’ चित्रपटाला ४८ वर्षे पूर्ण होतील. आजही या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर भरभरून लिहिलं जातं. पालेकरांचा आपला वाटणारा कॉमन मॅन अरुणप्रदीप, विद्या सिन्हाची प्रभा, असरानीचा नागेश आणि अशोक कुमार यांचा कर्नल विल्फ्रेड नगेंद्रनाथसिंग यांची नावे लोकांच्या आजही लक्षात आहेत, त्यावरून ‘छोटीसी बात’ची लोकप्रियता लक्षात येते.

दैनंदिन व्यवहारात आपण जे सहजतेने 'युद्धात आणि प्रेमात सारं काही क्षम्य असतं' म्हणतो अगदी तेच दिग्दर्शक बासू चॅटर्जी चित्रपटात प्रभावीपणे दाखवतात. ‘छोटीसी बात’मधला नायकही अधुरी होऊ पाहणारी प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी या उक्तीला खरं करत, मिळेल त्या मार्गाचा वापर करतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी प्रेमकहाणी असते जी काही अपरिहार्य कारणांपायी पूर्णत्वास गेलेली नसते. बासू चॅटर्जी छोटीसी कहानीतून माणसाच्या नेमक्या याच दुखऱ्या नसवर बोट ठेवतात. बघणाऱ्याला त्यात स्वतःला बघायला प्रवृत्त करतात. आपली अधुरी इच्छा पिक्चरमधून पूर्ण होताना बघणं प्रत्येकासाठी आनंददायी असतं आणि म्हणूनच ‘छोटीसी बात’सारखे चित्रपट यशस्वी ठरतात.

त्यासाठी नेहमीच्या पठडीबाज नायकाऐवजी बासू चॅटर्जी अरुणसारखा साधा सरळ प्रेक्षकातलाच काॅमन मॅन दाखवतात. असा काॅमन मॅन जो प्रेमभावनेपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही. परंतु आपल्यातील न्यूनगंडामुळे ते व्यक्तही करू शकत नाही. नायकाचं नायिकेवर प्रेम आहे, पण त्याला व्यक्त होता येत नाही म्हणून ते अधुरं. स्वत:वर विश्वास नसला की अधुऱ्या इच्छा दिवास्वप्नात पूर्ण करणं मानवी स्वभाव. याचा अतिशय सुंदर वापर बासूदा करतात. कथेचा नायक बऱ्याच इच्छा दिवास्वप्नात पूर्ण करत आलाय. त्याच्या इच्छाही किती साध्यासुध्या. आत्मविश्वासाने तिच्याशी बोलणं किंवा तिच्या हाताला स्पर्श करणं, अशा छोट्या इच्छेसोबत नागेश नावाच्या दोघांच्या प्रेमकहाणीतल्या व्हिलनचा, ज्याने नायकाचा जीव नकोसा केलाय, त्याला अद्दल घडवण्याची इच्छा बाळगून आहे. अर्थात प्रत्यक्षात तो काहीही करत नाही ही गोष्ट अलहिदा.

नायिकेलाही नायक आवडतो, पण स्त्री सुलभ स्वभावापायी ती प्रेमाची कबुली देत नाही. साध्या भोळ्या नायकाकडे ती आकर्षित होताना बघून खलनायक नागेश जमेल तसं नायकाचं मानसिक खच्चीकरण करतो. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, नायक जोवर चांगला असतो तोवर त्याचे सहकारी, प्यून, गंडे ताईत देणारा बुवा, गॅरेजचा मालक, नायिकेवर डोळा ठेवून असलेला नागेश सारेच त्याच्या चांगूलपणाचा फायदा घेतात, त्याला गृहीत धरतात. सिनेमात येणारे असे प्रसंग सामान्य माणसाच्या अनुभवासोबत साधर्म्य साधतात. आपल्या चांगल्या वागण्याचा कुणीतरी स्वार्थासाठी घेतलेला फायदा आठवून प्रेक्षकाने स्वतःला नायकामध्ये बघणं हा खरंतर छोटीसी कहानीचा यूएसपी.

आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या नायकाच्या प्रेमाचा प्रवास बुवाबाजी, गंडे ताईतपासून सुरू होऊन शेवटी कर्नल ज्युलियस नगेंद्रनाथसिंगपर्यंत येऊन संपतो. प्रेमात यशस्वी होण्याच्या वाटेवरच्या खाचाखोचा नवा गुरू कर्नल समजावून देत एका लाजऱ्याबुजऱ्या व्यक्तिमत्त्वाचा कायापालट करतो. स्वतःला पूर्णपणे बदलून नायक, नायिकेचं मन काबीज करतो. सोबत भूतकाळात त्रास दिलेल्या प्रत्येकाला वठणीवर आणतो. ऑफिसमध्ये आपल्या पदाचा, स्वतःचा मानसन्मान परत मिळवतो. अशक्य वाटणारी दिवास्वप्ने प्रत्यक्षात पूर्ण होऊ लागतात. नायकाच्या या साऱ्या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार होत गुंतून जातात. छोटीसी बात बघणाऱ्या प्रत्येकाला एक आशा दाखवतो. इच्छा आणि स्वतःवर विश्वास असेल तर जगात अशक्य असं काही नाही, हा विश्वास देतो.

चित्रपटाचा नायक अरुण कर्नलच्या ज्ञानाचा उपयोग करून प्रेमात, प्रभाच्या मनात आणि ऑफिसमध्ये खास स्थान प्राप्त करण्यात जरी यशस्वी होतो तरीही एकवेळ अशी येते जेव्हा त्याच्या सदसद‌्विवेकबुद्धीची कसोटी लागते. काहीवेळा गोष्टी सहजशक्य असतात. नेमकं तेव्हाच त्या क्लिष्ट करायची बुद्धी होणं हाही मानवी स्वभावच. अर्थात या कसोटीवर नायक पास होतो. कधी या प्रवासात आपलीही नायकाप्रमाणे अभिमन्यू अवस्था असते. अशावेळी अनुभवातून मिळालेले धडे आजमवायचे की स्वभावसापेक्षा निर्णय घ्यायचा अशी द्विधा मनस्थिती होते तेव्हा तेच करावं जे आपल्याला योग्य वाटतं. तसंही दरवेळी अनुभवांती घेतलेले निर्णय योग्य ठरतीलच असं नाही आणि हृदयाचा कौल चुकेल असंही होत नाही. कारण हृदय भलेही डावीकडे असलं तरी त्याचे निर्णय कधी कधी उजवे ठरतात.. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश छोटीसी बात ठामपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवतो.

मनुष्य स्वभाव कधीच बदलत नाही. पण प्रेमात मिळवणं हा हट्ट नसून ते जर जीवन बनलं असेल तर... स्वत:ला बदलणं भाग आहे. जगाशी दोनहात केल्यावर, स्वतःला पूर्णपणे बदलल्यानंतर नायकाला प्रेमाची प्राप्ती होते. एका साध्या तरुणाचं त्रास देणाऱ्यांबाबतीत बेरकी आणि प्रेमासाठी हुशार होत जाणारा कायापालट बघताना आपली इच्छा पूर्ण होण्याचं समाधान छोटीसी बात भरभरून देतो आणि काॅमन मॅनचं त्याचं ‘स्पेशल’ असण्यावर शिक्कामोर्तब करतो.

logo
marathi.freepressjournal.in