६० टक्के मुले ऑनलाईन मोबाईल, पीसी गेम्सकडे आकर्षित

प्रतिदिन १ ते २ पालक आपल्या मुलांना घेऊन समुपदेशनासाठी येत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.कविता वैद्य यांनी सांगितले
६० टक्के मुले ऑनलाईन मोबाईल, पीसी गेम्सकडे आकर्षित

काही वर्षांपूर्वी मैदानी खेळ खेळण्यासाठी पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन करायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मैदानी खेळ मुले विसरत चालले असून ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. प्रतिदिन १ ते २ पालक आपल्या मुलांना घेऊन समुपदेशनासाठी येत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.कविता वैद्य यांनी सांगितले. दरम्यान, ६० टक्के मुले ऑनलाईन मोबाईल, पीसी गेम्सकडे आकर्षित झाली असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आल्याचे वैद्य यांनी सांगितले.

२१व्या शतकात विज्ञानाच्या साहाय्याने तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व असे बदल घडले. मानवी जीवनाला आणि जागतिक स्पर्धेसाठी ते नक्कीच आवश्यक असले तरी काही गोष्टींचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाल्याने काही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विपर्यास झाला आहे. सध्याची तरुण पिढी अशाच प्रकारे गेमिंगच्या आहारी गेली आहे. ज्यामुळे मानवी जीवनावरच नाही, तर तरुण पिढीच्या आरोग्यावर देखील घातक परिणाम होत आहेत. मागील काही वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हा ट्रेंण्ड कायम असून मोबाईल, पीसी गेमिंग हा ट्रेंण्ड सर्वाधिक वेगाने वाढत आहे. भारतात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार चांगलाच बोकाळला आहे. पत्त्यांमधला रमी असो किंवा फँटसी क्रिकेट गेम असो, आजकाल प्रत्येक व्यक्ती ही मोबाईलमध्ये एकतर वेगवेगळे ३० सेकंदांचे व्हिडिओ तरी बघत असते किंवा गेम तरी खेळत असते.

मध्यंतरी आलेल्या ‘पब-जी’ या गेमने कित्येकांची झोप उडवली होती, शाळकरी मुलांना तर या गेमचे जणू व्यसनच लागलं होते. मधल्या काळात एचपी इंडिया गेमिंग लँडस्केपयांनी केलेल्या सर्व्हेक्षणात पाहायला मिळाले की, २०२१-२२ नुसार ६० टक्के मुले गेमिंगकडे आकर्षित झाली असून यासाठी मोबाईल आणि पीसीला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. पश्चिम भारतातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि नागपूर अशा शहरांमध्येहे चित्र सर्वाधिक दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी ‘ब्लू व्हेल’, पबजी गेमनं जगभरात हाहाकार माजवला होता. भारतात या गेमच्या आहारी जाऊन अनेकांनी आपला जीव गमावला तर अनेक पालकांनी मानसोपचारतज्ञ गाठले. परिणामी सर्वोच्च न्यायालयापासून ते केंद्र सरकार, मानसोपचार तज्ज्ञ आणि पालकदेखील यातून आपली सुटका करून घेण्यासाठी उपाययोजना करतांना दिसून आले.

या खेळांचा विसर

कामाच्या ताणातून हलकं होण्यासाठी विरंगुळा म्हणून खेळ खेळणं नवीन नाही. पूर्वी कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी असे बैठे तसेच ग्रामीण भागात विटीदांडू, सूर पारंब्या, लपंडाव तर कबड्डी, खो खो असे मैदानी खेळ खेळले जायचे. मात्र सध्या हे खेळ ठराविक गटाकडून खेळले जात आहेत. संगणक क्रांतीनंतर असे खेळ हळूहळू करत संपुष्टात आले. मैदानी खेळांची जागा डिजिटल खेळांनी घेतली. गेमच्या आहारी गेलेले मुले घरात, प्रवासादरम्यान काही सेकंदांसाठी देखील मोबाईलवर गेम्स खेळताना दिसत आहेत.

पालकांचे याबाबत मत काय?

मोबाईल गेमचे वेड इतके भयानक असेल असे वाटले नव्हते. मात्र मुले आता अर्धा एक तासाऐवजी चक्क ४ ते ५ तास विविध ऑनलाईन गेम्स खेळात असल्याने आम्ही चिंतेत सापडलो असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. ऑनलाईन गेम्समुळे घरातील दैनंदिन वेळापत्रक बिघडले असून खाण्यापिण्याचा वेळा देखील बिघडल्या आहेत. कारण गेम खेळत असताना मुले अगदी खाणं-पिणंसुद्धा विसरून जात असल्याची माहिती पालकांनी दिली. सर्वसामान्यांसाठी गेम म्हणजे निव्वळ करमणूक किंवा विरंगुळा असतो, पण कंपन्या त्यातून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवतात. मोबाइल गेमवर होणारी उलाढाल तब्बल कितीतरी बिलियन डॉलर आहे. आज लाखो व्हिडिओ गेम्स एका क्लिकवर अगदी सहज उपलब्ध होतात. आकर्षक डिझाईन, जिवंतपणाचा देखावा, क्षणिक व भौतिक सुखाचा आनंद देणारे गेम मुलांचे भविष्य बिघडवत आहेत. यामुळे मुलांच्या वागणुकीतही फरक पडला असून मुलांमध्ये राग येण्याचे तसेच आहाराकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती काही पालकांनी दिली.

शासनही हतबल

शासनाला असे गेम्स रोखण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विशिष्ट अॅप किंवा वेबसाईट्सवर संबंधित राज्यापुरतीच जिओ ब्लॉकिंगची कारवाई करणं राज्यांसाठी कठीण होऊन बसले आहे. शिवाय एका राज्यात जारी करण्यात आलेले आदेश दुसऱ्या राज्यांसाठी लागू करता येणार नाहीत. त्यामुळे देशभरात ऑनलाईन गेमिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणणं अवघड आहे. शिवाय देशाबाहेरून नियंत्रित होणाऱ्या वेबसाईट ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारएवढे अधिकार राज्य सरकारकडे नाहीत. २०२२च्या अखेरपर्यंत भारतीय मोबाईल गेमिंगमधून मिळणारे उत्पन्न हे १.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०२५ पर्यंत हा आकडा ५ अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो असा या क्षेत्रातील तज्ञांचं म्हणणं आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या अहवालानुसार ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अनेक कारणांमुळे मुलं हिंसक होत आहेत. अलीकडे त्याचे प्रमाण वाढत आहे. शहरांमधले पालक आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष ठेवू शकत नाहीत. म्हणून ते मुलांच्या हाती फोन देतात. मोबाईलवर मुले असे गेम्स खेळतात, ज्यातून हिंसक प्रवृत्तींना चालना मिळते. ऑनलाईन गेम्स सातत्याने खेळत असल्याने मुलांची अभ्यासातील गोडी नाहीशी होत आहे. ऑनलाईन गेम्समधील पात्रे प्रत्यक्ष आयुष्यात रंगवण्यात मुले अग्रेसर होत चालली आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन येत आहेत. आम्ही त्यांचे समुपदेशन करत आहोत. मात्र घरी गेल्यावर पालकांना न जुमानता मुले पहिले पाढे पंचावन्न यापद्धतीने पुन्हा गेम्सकडे आकर्षित होत आहेत.

- कविता वैद्य, मानसोपचारतज्ञ

logo
marathi.freepressjournal.in