भारतात दरवर्षी ७ लाख तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू

बदलती जीवनशैली, वाढता तणाव, व्यसन, आहारातील बिघडलेले संतुलन ठरतेय कारणीभूत
भारतात दरवर्षी ७ लाख तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू

जगभरात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनाने विविध व्याधींनी ग्रासल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण. देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की, भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात. सध्या भारतात दरवर्षी ३० लाख लोक हृदयविकाराने मरण पावत असून त्यातील २५ टक्के म्हणजेच ७ लाख मृत्यू हे ४० वयोवर्षापेक्षा कमी असल्याचे अहवालातून उघड झाले आहे.

हृदयविकाराचा धोका हा वयोमानापरत्व वाढता असला तरीही त्याची लागण ही अनेक अनुवंशिक आणि पर्यावरणातील घटकांवरही अवलंबून असते. मात्र अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचे निष्पन्न झाले आहे. वयाच्या विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी चुकीच्या पद्धतीची जीवनशैली सर्वस्वी कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १९९९ मध्ये प्रति १ लाख लोकांमध्ये सुमारे ८७ मृत्यू हृदयविकाराने झाले होते. हेच प्रमाण २०२१-२२ मध्ये १ लाख लोकांमध्ये शंभर पार गेल्याचे हृदयरोग तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक असून या नव्या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पुन्हा एकदा पारंपरिक अस्सल भारतीय जीवनशैली अंगीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय मोठ्या संख्येने तरुणांचे मृत्यू रोखण्यासाठी शासन स्तरावरही उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे.

भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू

तंबाखू सेवनामुळे अनेक प्राणघातक आजारांना निमंत्रण मिळते. यामध्ये हृदय रोग, फुफ्फुसाशी संबंधित रोग, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिन्यांमध्ये थर साचणे, मुख कर्करोग, हिरड्या, दात यांच्याशी संबंधित समस्या निर्माण होणे यांचा समावेश आहे. भारतात तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झाली आहे.

हृदय कमकुवत का?

- तणावपूर्ण आयुष्य

- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा

- उशिरापर्यंत काँप्युटरवर काम

- धूम्रपान, तंबाखू, दारूचं व्यसन

हार्ट अटॅकची लक्षणं?

- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटणे

- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात कळा

- मन अस्वस्थ होणे

- चक्कर येणे

- प्रचंड घाम येणे

- श्वास घेण्यात अडचण

- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घेणे

कोरोना महामारीनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनियंत्रित मधुमेह आणि धूम्रपानाचे व्यसन असलेल्या तरुण रुग्णांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. मागील २ वर्षांची माहिती घेतली तर त्यावेळी रुग्णालयात एका महिन्यात हृदयविकाराची १५ ते १८ प्रकरणे समोर येत होती. मात्र सद्यस्थितीत या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली असून ही संख्या ३० ते ३५ पर्यंत पोहोचली आहे.

- डॉ. संजीवकुमार कळकेकर, हृदयरोगतज्ज्ञ, नवी मुंबई

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in