आभासी देशभक्तीचा उत्सव

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. कैक जण हुतात्मा झाले होते.
आभासी देशभक्तीचा उत्सव

ऑगस्ट १९४७ला भारत स्वतंत्र झाला. १५० वर्षांची ब्रिटिशांची गुलामगिरी संपली. ब्रिटिश निघून गेले. त्याऐवजी आपले स्वतःचे राज्य आले. त्याला स्व-राज्य असे संबोधले गेले. अथक परिश्रम करून भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. संविधानानुसार भारतीय प्रजासत्ताक कारभार २६ जानेवारी १९५०पासून सुरू झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा गेला. त्याऐवजी आपला प्राणप्रिय तिरंगा त्याजागी आला.

हे स्वातंत्र्य काय आपसूक मिळालेले नव्हते. त्यासाठी प्रदीर्घ काळ लढा दिलेला होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. कैक जण हुतात्मा झाले होते. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता. ब्रिटिशांचा अन्याय, अत्याचार सहन केला होता. देशासाठी बरेच जण हसत हसत फाशीच्या तक्तावर चढले होते. स्वातंत्र्य लढून मिळविले होते व आहे. त्यात बहुजन लढले होते. त्यामुळे देशातील बहुसंख्य लोकांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले. साहजिकच संविधानाचे आणि तिरंग्याचेही त्यांनी स्वागत केले. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आला. तो साजरा करायची तयारी सुरू झाली. प्राचीन काळापासून आपल्या देशात अभिजन व बहुजन अशी विभागणी अस्तित्वात आहे. त्याला बरेच जण शोषक व शोषित असेही म्हणतात. त्यालाच ऐतखाऊ व राबून खाणारे असं संबोधण्यात येते. नाही रे आणि आहे रे असे ते दोन वर्ग आहेत. आहे रे वर्ग म्हणजेच शोषक हे नाही रे वर्गाच्या म्हणजेच शोषितांच्या कष्टावर जगतो. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य, संविधान, तिरंगा झेंडा, लोकशाही या समूहाला मान्य नव्हती व नाही. त्यास त्यांनी त्यांच्या परीने वेळोवेळी विरोध केला होता. त्यांना संविधानाऐवजी मनुस्मृती हवी होती. तिरंग्याच्या जागी त्यांना भगवा ध्वज हवा होता. म्हणून तर ते त्यांच्या ताब्यात असणाऱ्या संस्थेवर तिरंगा फडकवत नव्हते. त्यानीच पसरविलेल्या अंधश्रद्धेनुसार तीन हा आकडा अशुभ ठरविला असल्याने त्यांचा तिरंग्याला विरोध होता. त्यांनी त्यांना देशाच्या फाळणीचं अतीव दुःख असल्याचा आव आणून १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून ते स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येस दुखवटा साजरा करत होते. त्यांनी १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नाही. गांधीजी भिकारी होते. हे स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशांनी दिलेली भीक आहे. खरं स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, अशा कंड्या त्यांनी पिकवून बघितल्या. त्यास जनतेने थारा दिला नाही. महात्मा गांधीजींचा खुनी नथुराम याचं उदात्तीकरण त्यांनी करून बघितलं. मनुस्मृतीचे गोडवे गायिले. या त्यांच्या प्रयत्नांना जनतेने अजिबात स्वीकारले नाही. आपल्याला जनतेत थारा नाही. जनमानस आपली विकृत भूमिका मान्य करत नाही. याची त्यांना जाणीव व खात्री झाली. मग मात्र त्यांनी देशभक्ताचा मुखवटा चढविला. अत्यंत हुशारीने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या मंडळींनी एकदम यू टर्न घेतला. ‘घर घर तिरंगा’ असा नारा देत त्यांनी, प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा फडकवावा, असा पवित्रा घेतला. तिरंगा हेच देशभक्तीचे प्रतीक असे त्यांनी पद्धतशीरपणे जनमानसात पसरविले. ते इतक्या जोमाने तिरंग्याचे कौतुक करायला लागले की, हेच स्वातंत्र्य सैनिक आहेत, यांनीच देश स्वतंत्र केला आहे. हेच त्याग करणारे आहेत. असं लोकांना वाटू लागलं. थोडक्यात जे मूव्हमेंटमध्ये नव्हते, तेच इव्हेंट साजरा करायला आघाडीवर आले. हे करताना त्यांनी स्वातंत्र्याचे लाभ ज्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचले नाहीत, त्यांचा साधा विचारही केला नाही. प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा फडकवावा, असा त्यांनी फतवा काढला; पण ज्यांना घरच नाही त्यांनी तिरंगा कुठं लावायचा, याबाबत ते काही बोललेच नाहीत. तिरंगा फडकविल्याबाबत सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले; पण देशातील सही न करता येणारी लाखो माणसं आहेत, त्यांनी काय करावं याबाबत त्यांनी मौन पाळलं. देशात पायाभूत सुविधा नाहीत. केवळ आदिवासी या एकाच निकषावर नुकत्याच राष्ट्रपतीपदी विराजमान केलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मगावी अद्याप वीजपुरवठा केलेला नाही, हेही सोईस्करपणे विसरले. तिरंगी झेंडे खरेदी करण्याची काही ठिकाणी सक्ती केली.

आपल्याच हितसंबंधितांना तिरंगा उत्पादित करायला सांगून त्यांचा त्यांना आर्थिक लाभ करून दिला. तिरंग्याचा बाजार मांडला. जे तिरंगा फडकवतील ते देशप्रेमी आणि देशभक्त असे त्यांनी जाहीर केले. जे त्यांच्या हेतूवर शंका घेतील त्यांना थेट देशद्रोही, असा त्यांनी शिक्का मारला. आपण देशद्रोही ठरायला नको म्हणून बरेच जण त्यांच्या कळपात सामील झाले. मूव्हमेंटला विरोध करणाऱ्यांचा हा इव्हेंट बघायची वेळ जनतेवर आली. हे खरं तर देशभक्त नाहीत. त्यांनी देशभक्त असा आभास निर्माण केला आहे. त्या आभासी देशभक्तीचा उत्सव ते साजरा करत आहेत. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केले, त्यांचे आत्मे काय म्हणत असतील, हा देशवासीयांना प्रश्न भेडसावतो आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in