सत्यशोधक समाजाचे दीडशतक

सत्यशोधक समाजाच्या निर्मिती वेळीच सार्वजनिक सत्यधर्म जाहीरपणे सांगितला
सत्यशोधक समाजाचे दीडशतक

शूद्रातिशूद्र घटकासाठी उभी हयात खर्च केलेल्या महात्मा जोतिबा फुले यांनी वैदिक धर्मातील कर्मकांडाच्या कचाट्यातून बहुजनांना सोडविण्यासाठी अत्यंत विचारपूर्वकपणे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आपल्या मोजक्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पुणे येथे २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यात त्यांनी फक्त प्रस्थापितांना लक्ष्य करून नुसतीच टीका टिपणी केली नाही. तर त्यांनी बहुजनांना पर्याय दिला.

त्यांनी सत्यशोधक समाजाच्या निर्मिती वेळीच सार्वजनिक सत्यधर्म जाहीरपणे सांगितला. त्यांनी वैदिक, सनातनी, ब्राम्हणी धर्माला फक्त नाकारले नाही. तर त्यातील अविवेकी व विषमतावादी चालीरीतींना सुलभ व विवेकी पर्याय उपलब्ध करून दिला. त्या घटनेस १५० वर्षे पूर्ण झाली. सत्यशोधक समाजाने आपली दीडशतकांची यशस्वी वाटचाल केली. स्थापनेच्या वेळी एकूण सामाजिक वातावरण हे बहुजन समाजाला पोषक असे होते. मराठेशाहीशी गद्दारी करून पेशवाई समाजाच्या मानगुटीवर बसविण्यात प्रतिगामी अभिजन यशस्वी झाले होते. बहुजनांना असमानतेची वागणूक मिळत होती. त्यांना फक्त दुय्यम दर्जा देऊन हे मुनुवादी थांबले नव्हते. तर त्यांच्या अज्ञानाचा बेमालूमपणे गैरफायदा उठवून स्त्री शूद्रातिशूद्रांचे खुलेआम शोषण केले जात होते. स्त्री-पुरुष विषमतेबरोबरच जातीची उतरंड पक्की केली गेली होती. वर्णव्यवस्था हीच बहुजनांच्या पिळवणुकीचे धारदार हत्यार होते. कर्मकांड, उपास-तापास, पूजाअर्चा, व्रतवैकल्ये या सर्व प्रकारच्या अमानवी प्रथांना सुगीचे दिवस आले होते. वर्णवर्चस्ववाद व वर्गवर्चस्ववाद यांचे नको तितके स्तोम माजविले गेले होते. त्या सर्व बाबींना वैतागलेल्या बहुजनांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमुळे आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या अर्धशतकात सत्यशोधक समाज जोराने फोफावला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्यशोधक समाजाचे स्वतःचे असे साहित्य निर्माण झाले. सत्यशोधक विचाराने प्रभावित होऊन अनेक साहित्यिक लिहिते झाले. त्यात स्वतः महात्मा जोतिबा फुले तर प्रमुख होतेच. त्याशिवाय कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, जेधे, जवळकर, मुकुंदराव पाटील, श्रीपतराव शिंदे, लाड असे अनेक ख्यातनाम साहित्यिक सत्यशोधक समाजाने घडविले. सत्यशोधक समाजाचे विविध पातळ्यांवर काम जोमाने सुरू होते. मोठ्या प्रमाणात बहुजनवादी साहित्य निर्मिती होत होती. या साहित्याचे मुख्य वैशिष्ट्य वास्तववाद हेच होते. साहित्यिकांची ती फळी सत्यनिष्ठ होती. बहुजनवादी होती. वास्तव विचार शब्दबद्ध करणारे हे साहित्यिक कायमपणे प्रस्थापितांच्या विरोधी विचार मांडणारे होते. वैदिक, सनातनी, ब्राम्हणी व्यवस्थेने बहुजनांचे केलेले शोषण व पिळवणूक यांना त्या साहित्यात मुख्य स्थान दिलेले होते. त्यांच्या शोषणाचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले होते.

प्रस्थापित ललित साहित्यिकांनी मात्र या साहित्याला व साहित्यिकांना फारसे महत्त्व दिले नाही. किंबहुना, त्याकडे मुद्दाम व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एक मोठा साहित्य प्रवाह अनुल्लेखाने मारला गेला. त्यामुळे त्या साहित्यात सातत्य टिकले नाही. मोठा वर्ग सत्यशोधक समाजाकडे आकर्षित होत असल्याचे सनातन्यांच्या लक्षात आले. महात्मा फुले यांनी बहुजनांना अत्यंत साधे सोपे पर्याय उपलब्ध करून दिले होते. त्यांनी माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व पर्यायी विधिलिखित स्वरूपात दिले होते. त्यात लग्नविधी, ग्रहप्रवेश, बारसे, अंत्यविधी वगैरे सर्व प्रकारच्या विधींचा समावेश होता. सत्यशोधक समाजाने वैदिक धर्मात सांगितलेला ईश्वर नाकारला होता. त्याऐवजी निर्मिक त्यास पर्याय म्हणून दिला होता. ग्रहप्रवेशा वेळी आई-वडील यांचे पूजन करून घर बांधकाम करणाऱ्या कारागिरांचा सन्मान करण्याची तरतूद केली होती. लग्नात म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टका या पती-पत्नीने एकमेकाला समतेची वागणूक देणाऱ्या आशय असणाऱ्या होत्या.

सत्यशोधक समाजाचा जोर पाहिले काही दिवस फार होता. नंतर म्हणजे १८९४ साली मात्र सनातन्यांनी बाळ गंगाधर टिळकांना पुढे करून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यास भले समाजाने एकत्र यावे यासाठीचे वरवर कारण दिले असले तरी त्यांचा मुख्य उद्देश मात्र सत्यशोधक समाजाला शह देण्यासाठी होता. असे अनुमान काढण्यासाठी वाव आहे. स्वतंत्र साहित्याचे अस्तित्व नाकारणे व माणसांना दैववाद आणि कर्मकांड यांच्या नादी लावणे, हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. त्यात भरीस भर म्हणून महात्मा जोतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे ब्राम्हणेतर समाजात रूपांतर केले गेले. महात्मा फुले आणि समस्त सत्यशोधक चळवळ यावर ब्राह्मणविरोधी चळवळ असा शिक्का मारण्यात आला. महात्मा फुले यांना ब्रम्हणद्वेष्टा ठरविण्यात आले.

‘ख्रिस्त महम्मद, मांग ब्राह्मणासी। धरावे पोटाशी बंधुपरी ।।’ या फुलेंच्या विचारांचा तो पराभव ठरला. वैदिक धर्म आणि सार्वजनिक सत्य धर्म याचे रूपांतर कालांतराने ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळीत करण्यात आले. त्यास वैदिक सनातनी धर्ममार्तंड जितके जबाबदार आहेत, तितकेच सत्ताशोधक बनलेले सत्यशोधक समाजाचे तत्कालीन नेतेही तितकेच जबाबदार आहेत. एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, शेवटी बहुजनांना म्हणजे स्त्री शूद्रातिशूद्रांना सत्यशोधक समाजाशिवाय पर्याय नाही. त्यांनी आता १५० वर्षांनंतर का असेना सत्यशोधक समाजाच्या विचाराची पाठराखण केली पाहिजे. त्यातच त्यांचे हित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in