आरोग्य आणि आरोग्यविमा पी.व्ही.सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत (भाग १)

स्वातंत्र्य संकल्पनाच खूप व्यापक आहे, महात्मा गांधींनी या सर्वाचा विचार खूप खोलवर केला होता
आरोग्य आणि आरोग्यविमा पी.व्ही.सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत (भाग १)

व्ही. सुब्रमण्यम हे भारतातील अग्रगण्य प्रशिक्षक असून, त्यांनी आर्थिक नियोजन या विषयावर पुस्तकेही लिहिली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत; परंतु आजही भारतातील ७० टक्के जनतेस आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे? हे जर आपण जाणून घेतले तरच भविष्यात आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ. बरेचदा आपण ध्येयनिश्चिती करत असतो; परंतु तेथे पोहोचू शकत नाही. आपल्या आयुष्यात एक क्षण असा येतो, जेव्हा आपण सर्व गोष्टी स्वतःच करण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःच घर, स्वतःची गाडी, विविध खर्च जसे आरोग्यावरही खर्च, मनोरंजन इतर खर्च इत्यादी. ही पात्रता येण्यासाठी बरच काही ज्ञान मिळवावं लागतं, त्याचा योग्य तो वापर करावा लागतो. या विषयावर २३ ऑगस्ट रोजी एका वेबिनारमधून त्यांनी दिलेल्या भाषणाचा हा वृतान्त. याच विषयावरील चर्चेनेही आपला जीवनक्रम/ प्राधान्यक्रम बदलू शकतो. सरांचे ज्ञान, एवढ्या वर्षाचा विविध क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता त्यातून महत्त्वाची माहिती मिळणे हे स्वाभाविकच होतं. या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी -

त्याच्या मनात ‘स्वातंत्र्य’ याविषयी कोणते विचार आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यामते, स्वातंत्र्य संकल्पनाच खूप व्यापक आहे, महात्मा गांधींनी या सर्वाचा विचार खूप खोलवर केला होता. फक्त आर्थिकच नव्हे, तर प्रत्येक गोष्टींपासून त्यांना स्वातंत्र्य मिळवायचं होतं. स्वावलंबन हे त्याचं महत्त्वाचं सूत्र होतं. ते स्वतः सूतकताई करत, कापड विणत, त्यांनी पाळलेल्या बकरीचे दूध ते स्वतः काढत असत, साफसफाई ते स्वतःच करत असत, फारसे आजारी पडत नसत. आपण व्यवस्थित राहिलो, श्रम केले, योग्य वेळी योग्य आहार घेतला तर आजार होणार नाही. समस्या या आपण स्वतःच ओढवून घेत असतो, असं ते म्हणत. हे थोडं मजेशीर वाटत असलं तरी यामागील तथ्य तपासून पाहू. माझं डोकं दुखत असेल तर मी तेच धरून बसतो. त्याचा विचार करता करता मी पडून पाय मोडला तर माझे लक्ष डोकं दुखतंय त्यावरून उडून पायावर केंद्रित होतं. जेव्हा तुम्ही मला बरं नाही म्हणता, तेव्हा मला कोणताच विकार होऊ नये यासाठी मी काय केलं, याचा विचार प्रथम करावा. मी जर व्यवस्थित काम केलं असतं, योग्य आहार घेतला असता, व्यायाम केला असता तर ही वेळच माझ्यावर आली नसती. तेव्हा मी आजारी आहे, असं म्हणायची आपल्याला शरम वाटायला हवी. आता लोकांना असं वाटतं माझ्याकडे पैसे आहेत, त्यामुळे मी आजारी पडल्यास उत्तम हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकतो, वेगळा सेवक ठेवू शकतो, आचारी ठेवू शकतो, ड्रायव्हर बाळगू शकतो. लोकांना समस्या मुळातून सोडवावी, असे वाटतच नाही. त्यांना व्यायाम करा, सांगणारा डॉक्टर आवडत नाही. त्यांनी तुम्हाला ब्लडप्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे, असे सांगणारा डॉक्टर आवडतो. जणू काही असे विकार असणे त्यांच्या प्रतिष्ठेत भर घालणारे आहेत, असे त्यांना वाटते. तेव्हा स्वातंत्र्य या संकल्पनेचा विचार करताना मला हवं असणारं स्वातंत्र्य, हे नक्की कशापासून हवंय? ताणापासून/आजारापासून हवंय? की, अनारोग्यापासून हवंय? असं पूर्ण सामाजिक स्वातंत्र्य, मानसिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य हवंय, असं यातून अभिप्रेत आहे. एक गोष्ट आहे आणि दुसरी नाही, याचा अर्थ आपण कोणावर तरी अवलंबून आहोत. तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे स्वतः निश्चित करायचं आहे.

आता तुम्ही आरोग्याचा विषय काढलात; पण बरेचदा आपण पैसे मिळवण्यावर लक्ष केंद्रित करीत असतो, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा आरोग्य आणि आरोग्यविमा याकडे आपण कसं पाहता? याची आवश्यकता का आहे? याबाबत काही सांगू शकाल?

आपल्याकडे थोडे जास्त पैसे आले की, आपल्या आहाराच्या सवयी बदलतात. जगभरात याबद्दल काय होते ते मला माहिती नाही; पण भारतात पैसे असलेला माणूस दिवसांतून सात वेळा खातो. प्रत्यक्षात त्याची खरी गरज दोनदा जेवण आणि एकदा न्याहारी अशी फक्त तीन वेळाच आहे. तेव्हा आपलं आरोग्य राखण्यासाठी तीन वेळाहून अधिक खाण्याची गरज नाही, जर तुम्ही दिवसभरातून ६/७ वेळा खात असाल तर हळूहळू ते कमी करा. तेव्हा आहार कमी आणि तुलनेत व्यायाम अधिक केलात तर आरोग्याच्या समस्या उद‌्भवणार नाहीत. तरीही काही झालंच तर आरोग्यविमा आहे. याचा अर्थ तुमचं बिल तुम्ही नाही तर अन्य कोणीतरी भरणार आहे; पण तुमच्या वेदना तुम्हालाच भोगाव्या लागतील, त्या कोणी घेऊ शकत नाही. तेव्हा आरोग्याची काळजी घ्या, सकस आहार घ्या, प्रोसेस फूड टाळा, नियमित व्यायाम करा. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित आहे. तो असावा; पण वापरला जावा, अशी इच्छा बाळगू नका. आपल्याला इन्शुरन्स वापरावा न लागणे म्हणजे आपण खूश (वाढलेला प्रीमियम आपल्याला अलीकडे नाराज करत असतो तो भाग वेगळा) लोकांचा प्रीमियम मिळत राहून क्लेम आला नाही म्हणजे आपली इन्शुरन्स कंपनी खूश. माझ्या टर्म इन्शुरन्सचा हप्ता फुकट जावा, अशी मी प्रार्थना करत असतो. माझा इन्शुरन्स वापरला न जाणे म्हणजे मी जगणे, इन्शुरन्स असल्याने आपल्या मागे काय होईल, याबद्दल निश्चितता तर क्लेम न आल्याने कंपनी यांना आनंद मिळेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in