बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासार्ह वारसा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ देशभर नेण्याचे काम रामदास आठवले करत आहेत. भारत सरकारचे पहिले केंद्रीय कायदा मंत्री असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचणारे त्यांचे पहिले अनुयायी म्हणजे रामदास आठवले होत.
बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासार्ह वारसा
YouTube/DD India
Published on

दखल

- हेमंत रणपिसे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ देशभर नेण्याचे काम रामदास आठवले करत आहेत. भारत सरकारचे पहिले केंद्रीय कायदा मंत्री असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचणारे त्यांचे पहिले अनुयायी म्हणजे रामदास आठवले होत. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने रामदास आठवले यांनी केंद्र सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा राज्यमंत्री बनण्याचा इतिहास घडविला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची धुरा ज्यांच्या हाती सोपविण्यात आली ते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले देशात राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. २००९ नंतर रामदास आठवले यांनी एकही लोकसभा निवडणूक लढवली नाही. तरी २०१६ पासून रामदास आठवले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. ५ जुलै २०१६, ३० मे २०१९ आणि आता ९ जून २०२४ अशी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची शपथ रामदास आठवले यांनी घेतली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार नाही आणि लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचा एकही खासदार नाही. तरी देखील रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅट‌्ट्रिक मारतात. क्रिकेटमधील हॅट‌्ट्रिक एक वेळ विसरता येईल, मात्र राजकारणातील केंद्रीय राज्यमंत्री पदाची हॅट‌्ट्रिक ही ऐतिहासिक आहे. त्यामुळे या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या हॅट‌्ट्रिकची कारणमीमांसा प्रत्येकाला कराविशी वाटते.

राजकारणात विश्वासार्हता आणि उपयुक्ततामूल्य या दोन कसोट्या असतात. रामदास आठवले यांचे नेतृत्व या दोन्ही कसोट्यांवर सोळा आणे शुद्ध सोने ठरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील युती-आघाडीचे यश-अपयश ठरविणारी राजकीय ताकद आजही आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाकडे आहे. आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीचेच प्रतीक आहे. या भीमशक्तीचा विश्वास जिंकणारे रामदास आठवले गेली ४५ वर्षे आपल्या नेतृत्वाचे गारुड टिकवून आहेत. त्यांचा साधा सरळ विनम्र स्वभाव, त्यांच्या भाषणातील यमक जुळवणाऱ्या चारोळ्या या श्रोत्यांचे मन जुळवणाऱ्या ठरतात. त्यांच्या एवढा उत्कृष्ट संघटक नेता देशात आजघडीला कोणीही नाही. त्यांना भेटणारा प्रत्येक माणूस त्यांच्यासोबत आयुष्यभरासाठी जोडला जातो. रिपब्लिकन पक्षाचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी संख्येने कमी असतील, पण संघटनात्मकदृष्ट्या रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे.

प्रस्थापित पक्ष जिथे पोहचू शकत नाहीत अशा दिव-दमण-अंदमान-निकोबार-पाँडिचेरी येथे रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. लक्षद्विपमध्येही रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन होणार आहे. सिक्कीम या राज्यातही रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन झाली आहे. नागालँडसारख्या दुर्गम राज्यात रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार स्वबळावर निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मणिपूरमध्येही रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर एक जागा लढवली. त्यात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारला एक लाख ३५ हजार मते मिळाली. ती १७ टक्के मते होती. त्यामुळे मणिपूरमध्येही रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. नागालँड आणि मणिपूर या राज्यात रिपाइंला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळेल. राष्ट्रीय स्तरावर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा प्रभाव वाढत असल्याचेच हे द्योतक आहे.

दलित पँथर आणि त्यानंतर भारतीय दलित पँथरपासून रामदास आठवले यांचे नेतृत्व वादळ होऊन देशभर घोंगावत आहे. जिथे जिथे दलितांवर अन्याय-अत्याचार होईल तिथे रामदास आठवले नावाचा पँथर पोहोचतो आणि अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, भूमिहीनांचा लढा, रिडल्सचा लढा आणि अलीकडे इंदूमिलचा लढा जिंकून रामदास आठवले यांनी दलितांची मने जिकंली आहेत. दलितांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढताना त्यांनी सवर्ण आणि दलित यांच्यात समेट घडवून आणत सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्नही सतत केला आहे. त्यासाठी मराठा समाजातील गरीबांना आरक्षण दिले पाहिजे, ही मागणी त्यांनीच सर्वप्रथम लोकसभेत मांडली.

त्यांची भूमिका कायम सर्व समाजाला न्याय देण्याची आहे. त्यामुळे १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्राचे समाजकल्याण खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद लाभले आणि आता केंद्रातही त्याच खात्यांचे तिसऱ्यांदा राज्यमंत्री पद लाभले आहे. रामदास आठवलेंनी सामाजिक न्यायाच्या चळवळीत सातत्याने प्रचंड संघर्ष केल्यामुळे संपूर्ण देशात ते सामाजिक न्यायाच्या चळवळीचा चेहरा, ब्रँड ॲम्बेसिडर ठरले आहेत.

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांची लढाई सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असताना रामदास आठवले यांना महायुतीने एकही लोकसभेची जागा दिली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला अनेकदा भाजपने सत्तेत सन्मानजनक वाटा दिला नाही किंवा कुठे जागावाटपात जागा दिल्या नाहीत. तरी सुद्धा रामदास आठवलेंनी युती धर्म पाळला. त्यामुळे राजकारणात रामदास आठवलेंची विश्वासार्हता अधिक आहे. व्यक्तिगत पातळीवर ते कुणावरही टीका करत नाहीत. महाराष्ट्राचा हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्राची ओळख आहे. ती जपण्याचे काम रामदास आठवले करतात. त्यामुळे आज दिल्लीत त्यांच्याभोवती सर्व जाती-धर्मांचे लोक जोडले जात आहेत. ते खरे राष्ट्रीय नेते आहेत.

(लेखक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे प्रसिद्धी प्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in